कोलकाता : इंग्लंडनं स्पेनचा ५-२ असा पराभव करून, अंडर-17 फिफा विश्वचषकावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं. स्पेनला या विश्वचषकाच्या इतिहासात चौथ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.

कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात सर्जिओ गोमेझनं १०व्या आणि ३१व्या मिनिटाला एकेक गोल डागून स्पेनला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती. पण रियान ब्रूस्टरनं ४४व्या मिनिटाला झळकावलेल्या गोलनं इंग्लंडला या सामन्यात कमबॅक करण्याची संधी मिळवून दिली. मग उत्तरार्धात मॉर्गन गिब्स व्हाईटनं ५८व्या इंग्लंडला बरोबरी साधून दिली. त्यानंतर फिलिप फोडेननं ६९व्या आणि ८८व्या मिनिटाला, तर मार्क गिहीनं ८४व्या मिनिटाला केलेल्या गोल्सनी इंग्लंडला ५-२ असा शानदार विजय मिळवून दिला.

स्पेननं याच वर्षी इंग्लंडवर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात करून अंडर सेव्हन्टिन युरोपियन विजेतेपद पटकावलं होतं. इंग्लंडनं अंडर सेव्हन्टिन फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये त्या पराभवाचा वचपा काढला.