लॉर्ड्स कसोटीत भारताचा एक डाव आणि 159 धावांनी पराभव
एबीपी माझा वेब टीम | 12 Aug 2018 10:21 PM (IST)
इंग्लंडने टीम इंडियाचा या कसोटीत एक डाव आणि 159 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह इंग्लंडने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.
लंडन : विराट कोहलीची टीम इंडिया एजबॅस्टनपाठोपाठ लॉर्डस कसोटीतही चारीमुंड्या चीत झाली. इंग्लंडने टीम इंडियाचा या कसोटीत एक डाव आणि 159 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह इंग्लंडने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या कसोटीत इंग्लंडने आज चौथ्या दिवशी सात बाद 396 धावसंख्येवर आपला पहिला डाव घोषित केला. त्यामुळे डावाचा मारा चुकवण्यासाठी टीम इंडियासमोर 289 धावांचं आव्हान होतं. पण इंग्लंडच्या प्रभावी आक्रमणासमोर भारताचा दुसरा डाव 130 धावांत गडगडला. लॉर्डस कसोटीत टीम इंडिया पहिल्या डावात 107 धावांत गारद झाली होती. याचा अर्थ भारतीय फलंदाजांना दोन्ही डावात मिळून केवळ 237 धावा जमवता आल्या. भारताच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलं नाही. इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने भारतीय फलंदाजांना पळता भुई थोडी केली. त्याने पहिल्या डावात भारताचे पाच फलंदाज माघारी धाडले होते. तर दुसऱ्या डावातही चार विकेट घेत एकाच कसोटीत नऊ फलंदाज त्याने बाद केले. याशिवाय स्टुअर्ट ब्रॉडनेही त्याला साथ दिली. पावसामुळे या कसोटीचा पहिला दिवस वाया गेला होता. दुसऱ्या दिवशी भारतीय संघ 107 धावांवर बाद झाला. एकीकडे भारतीय संघ स्वस्तात बाद झाला, तर दुसरीकडे इंग्लंडचे फलंदाज शतकी आणि अर्धशतकी खेळी करत होते.