मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली त्याच्या आक्रमकतेसाठी परिचीत आहे. विरोधकांना तो बॅटने उत्तर देतोच, शिवाय त्यांच्या स्लेजिंग किंवा टीका टिप्पणीला तो जशास तसं उत्तर देतो. सध्याची ही परिस्थिती असली, तरी विराटच्या पदार्पणाच्या काळात तो प्रेक्षकांशीही वाद घालताना दिसला होता. एकवेळ अशी आली होती की त्याला माफी मागावी लागली होती.

याबाबतचा खुलासा स्वत: कोहलीनेच केला आहे. क्रिकेज मॅग्झिन विजडनला दिलेल्या मुलाखतीत कोहलीने हा किस्सा सांगितला.

2012 मध्ये कोहलीने प्रेक्षकाला मधलं बोट (मिडल फिंगर) दाखवलं होतं. त्यावेळी त्याला मॅचरेफरींची माफी मागावी लागली होती. कोहली म्हणाला, “2012 मध्ये सिडनी कसोटीत, प्रेक्षकांनी कोहलीला टोमणे मारले होते. त्यावेळी चिडलेल्या कोहलीने प्रेक्षकांकडे पाहून मधलं बोट दाखवलं होतं. कोहलीचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं होतं. त्यामुळे कोहलीविरोधात मॅचरेफरींनी आक्रमक पवित्रा घेतला होता.

मॅच रेफरी रंजन मुदगले यांनी कोहलीला विचारलं होतं, काल सीमारेषेजवळ काय झालं होतं? त्यावर कोहलीने बोलण्यास टाळाटाळ केली, तेव्हा रेफरींनी अनेक वृत्तपत्र कोहलीला दाखवली. त्या वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावरच कोहलीचा फोटो छापण्यात आला होता.

त्यावेळी ओशाळलेला कोहली घायकुतीला आला आणि त्याने मॅच रेफरींना विनवणी करत, मी माफी मागतो, पण बंदी घालू नका असं म्हटलं होतं. कोहलीला त्यावेळी माफ करण्यात आलं होतं, मात्र तो किस्सा कोहली आजही विसरलेला नाही.