पावसात ऑफिसला आल्यास 'डकवर्थ ल्युईस'नुसार पगार द्या, सेहवागच्या सल्ल्याने खसखस
एबीपी माझा वेब टीम | 11 Jul 2019 09:17 PM (IST)
जर पावसातही कर्मचारी ऑफिसला येत असतील तर, त्यांचा पगारही डकवर्थ ल्युईस पद्धतीने द्यावा, असा सल्ला क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने ट्विटरवरुन देताच नेटिझन्सच्या कल्पकतेला धुमारे फुटले
Getty Images)
मुंबई : विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड उपान्त्य सामन्याच्या पहिल्या दिवशी पाऊस पडल्यामुळे डकवर्थ ल्युईस पद्धतीचा वापर होण्याची शक्यता निर्माण झाली होती, त्यामुळे आधीच टीम इंडियासह भारतीय चाहतेही धास्तावले होते. त्यानंतर क्रिकेटपटू आणि 'ट्विटरसम्राट' वीरेंद्र सेहवागने 'डकवर्थ ल्युईस'चा मैदानााबाहेरील एक अनोखा वापर सुचवला. 'पावसाळी महिन्यांचा पगारही जर डकवर्थ ल्युईस पद्धतीने दिला, तर फायदेशीर ठरेल का? जर पावसातही कर्मचारी ऑफिसला येत असतील तर. काय वाटतं एचआर मंडळींना?' असा गमतीदार ट्वीट वीरेंद्र सेहवागने केला. नेहमीप्रमाणेच सेहवागचा ट्वीट पाहून अनेकांच्या (यावेळी, एचआर मंडळी सोडून) गालावर हसू आलं. अनेक जणांनी सेहवागचा कल्पक सल्ला उचलून धरला. कोणी आपल्या मित्रांना मेन्शन करुन रिट्वीट केलं, तर कोणी थेट बॉस आणि एचआरला टॅग करण्याचीही हिंमत दाखवली. तुफान पावसात तुंबलेल्या पाण्यातून ऑफिसला जाणं जीवावर येत असल्यामुळे अनेक जण घरी बसणं पसंत करत होते. विश्वचषकातील सामने पाहण्यासाठी कोणी पावसाची ढाल पुढे करुन ऑफिसला बुट्टी मारत होतं. मात्र सेहवागच्या सूचनेप्रमाणे वाढीव पगार मिळत असेल, तर जायला हरकत नसल्याचं काही जणांनी सोशल मीडियावर म्हटलं. अर्थात, डकवर्थ ल्युईस पद्धत आणि तिची आकडेमोड नेमकी कशी होते, याचं गणित भल्याभल्या क्रिकेटपटूंनाही जमत नाही. त्यामुळे आमचा एचआर तरी घोळ न घालता योग्य पगार देईल का, असं म्हणत काही जणांनी खसखस पिकवली. तर एचआर मंडळींनीही कर्मचाऱ्यांनीही डकवर्थ ल्युईसनुसार काम करावं, असं सुचवलं