दुबई : भारताच्या पी. व्ही. सिंधूला दुबई सुपर सीरीज फायनल्समध्येही उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. जपानच्या अकाने यामागुचीने सिंधूचा 15-21, 21-12, 21-19 असा पराभव करून विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.


सिंधूला 2016 साली रिओ ऑलिम्पिकमध्ये आणि 2017 साली ग्लास्गो जागतिक विजेतेपद स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. त्यापाठोपाठ बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची शिखर स्पर्धा असलेल्या दुबई सुपर सीरीज फायनल्समध्येही सिंधूच्या चाहत्यांची निराशा झाली. तिला पुन्हा उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं.

सिंधूने चीनच्या चेन युफेचा 21-15, 21-18 असा धुव्वा उडवून दुबई सुपर सीरीज फायनल्सच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूचा मुकाबला जपानच्या अकाने यामागुचीशी झाला. सिंधूने 2016 साली रिओ ऑलिम्पिकची, तर 2017 साली ग्लास्गो जागतिक विजेतेपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

त्यानंतर सिंधूने दुबई सुपर सीरीज फायनल्सच्या अंतिम फेरीचं तिकीट मिळवून आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला. सिंधूने यंदाच्या मोसमात इंडिया ओपन आणि कोरिया ओपन या सुपर सीरीजची विजेतीपदं पटकावली.