बंगळुरु : 'द वॉल' राहुल द्रविडच्या दहा वर्षांच्या मुलगा समितने अंडर-14 क्लब क्रिकेट सामन्यात शानदार शतक ठोकलं आहे. लोयोला ग्राऊंडवर बंगलोर युनायटेड क्रिकेट क्लबतर्फे (बीयूसीसी) खेळताना समितने फ्रँक अँथनी पब्लिक स्कूलविरुद्ध 125 धावांची खेळी रचली. हा सामना बीयूसीसीने 246 धावांनी जिंकला.
समितची 12 चौकारांची आतषबाजी
- समितने त्याच्या धडाकेबाज खेळीत 12 चौकारांची आतषबाजी केली. प्रत्युषपाठोपाठ त्याने संघासाठी दुसरी मोठी खेळी रचली. प्रत्युषने 143 धावा तर समितने 125 धावा केल्या.
- या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 213 धावांची भागीदारी रचली.
- 30 षटकांच्या सामन्यात बीयूसीसीने 326 धावा केल्या तर फ्रँक अँथनी पब्लिक स्कूलचा डाव केवळ 80 धावांवर आटोपला.
- मागील वर्षी सप्टेंबरमध्ये अंडर-12 गोपालन क्रिकेट चॅलेंजमध्ये त्याने सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार पटकावला होता.
- त्याने या स्पर्धेत तीन अर्धशतकं (77*, 93,आणि 77) ठोकली आहेत.
16 संघामध्ये समावेश
- स्कूल आणि क्लबचे 16 संघ या स्पर्धेत खेळत आहेत .
- अंडर-12 आणि अंडर-14 क्रिकेट अंतर्गत 35 दिवसात सुमारे 117 सामने खेळवण्यात येतील.
- हायर एज कॅटेगरीसाठी क्रिकेटपटूंना तयार करणं हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
समितबाबत राहुल काय विचार करतो?
मागील वर्षी मीडियाशी बोलताना राहुल द्रविड म्हणाला होता की, 'समित चांगलं क्रिकेट खेळतो. त्याचं हॅण्ड-आय कोऑर्डिनेशनही उत्तम आहे. तो फक्त बॉल टोलवतो. त्यामुळेच मी त्याला हे करण्यासाठी प्रोत्साहित करतो. मी त्याला शिकवण्याचा प्रयत्न करत नाही. त्याने क्रिकेटचा आनंद घ्यावा आणि उत्तम खेळावं, असं मला वाटतं.