Asian Taekwondo Championships : कांस्यपदक विजेत्या रुपा बायोरच्या कामगिरीला उजाळा देत सीता, हर्षा सिंघा, उषा धामणस्कर यांनी आशियाई तायक्वांदाे स्पर्धेत भारतीय संघासाठी पदकांचे दुहेरी यश संपादन केले. या तीनही नैपुण्यवान खेळाडूंनी सर्वाोत्तम कामगिरी नोंदवली आणि पुमसे खेळ प्रकारात भारतीय संघाला रौप्यपदकाचा बहुमान मिळवून दिला. (Double Success for India in Asian Taekwondo Championships; Silver in Poomsae)
हे भारतीय संघाचे या स्पर्धेतील ऐतिहासिक पदक ठरले. सीता, हर्षा आणि उषा यांनी या गटात ३० गुणांची कमाई करत पदकाचा पल्ला यशस्वीपणे गाठला. या पदकासह भारतीय संघाच्या नावे स्पर्धेत सलग दुसऱ्या पदकाची नोंद झाली. अरुणाचल प्रदेशच्या रुपाने पहिल्याच दिवशी पदकाचे खाते उघडले होते. तिने मंगळवारी पुमसे गटात कांस्यपदकाची कमाई केली होती.
भारतीय तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने व्हिएतनाममधील या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर भारतीय तायक्वांदो संघाने क्रीडा विश्वात धडाकेबाज मुसंडी मारली आहे. यामुळे संघाला पहिल्याच आशियाई स्पर्धेत पदकाचा इतिहास रचता आला. आता भारतीय संघाला या स्पर्धेत मोठे यश संपादन करण्याची संधी आहे.
खेळाडूंची कामगिरी काैतुकास्पद : शिरगावकर
भारतीय संघातील खेळाडूंनी अथक परिश्रमातून हे ऐतिहासिक पदक मिळवले आहे. गुणवंत खेळाडूंना आपला वेगळा ठसा उमवटण्याची माेठी संधी आहे. आता हे पदक सर्वांसाठी अभिमानास्पद ठरलेले आहे, यामुळे हे इतिहास रचणारे खेळाडू सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहेत. यासाठी खेळाडूंनी कसून तयारी केली होती. भविष्यातही ते अशीच उंच झेप घेतील अशा शब्दात अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांनी काैतुकाचा वर्षाव केला.
आजपासून क्युरोगीच्या स्पर्धा; युवा खेळाडू आहेत पदकाचे शिलेदार
व्हिएतनाम येथील आशियाई स्पर्धेतील क्युरोगीच्या इव्हेंटला गुरुवारपासून सुरुवात होईल. या प्रकारातही भारतीय संघ पदकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारतीय क्युरोगी संघातील प्रशांत राणा, अजय कुमार, नवीन, भुमेश कुमार मैथिल, शिवांश त्यागी, ऋषभ, सक्षम यादव, रक्षा चहर, सानिया खान, अनुशिया प्रेमराज, इतिशा दास, रुदाली बारूआ हे पदकाचे प्रबळ दावेदार आहेत.
आणखी वाचा :
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक