भारताची जिम्नॅस्ट दिपा करमाकरची ऐतिहासिक कामगिरी
एबीपी माझा वेब टीम | 18 Apr 2016 03:05 AM (IST)
रिओ दी जानेरो : भारताची जिम्नॅस्ट दिपा करमाकरने इतिहास रचला आहे. 22 वर्षीय दिपा रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी दिपा करमाकर ही पहिलीच भारतीय जिम्नॅस्ट आहे. रिओ दी जानेरो येथे ऑलिम्पिक चाचणी आणि अंतिम पात्रता स्पर्धा सुरु आहे. यामध्ये दिपा करमाकरने शानदार कामगिरी करत रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला. ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत महिला आर्टिस्टिक प्रकारात नववं स्थान पटकावत तिने 52.698 गुणांची कमाई केली. आंतराराष्ट्रीय सामनाधिकारी दीपक काग्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 52.698 गुणांच्या कमाईसह दिपा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरेल, याची खात्री होती. परंतु आणखी तीन सबडिव्हिजन शिल्लक होते. मात्र दिपाने तीन देशांचा जिम्नॅस्टना आधीच पराभूत केल्याने ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. ग्लासगो इथे 2014 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत दिपा करमाकरने कांस्य पदक जिंकलं होतं.