मुंबई : फुटबॉल विश्वचषकात गुरूवारी क्रोएशियाविरुद्ध अर्जेंटिनाचा झालेला पराभव जिव्हारी लागल्याने लायनल मेसीचा चाहता घरातून गायब झाल्याची धक्कादायक घटना केरळात घडली आहे. बिनू अॅलेक्स असं या 30 वर्षीय तरुणाचं नाव आहे.

स्थानिकांच्या मदतीने पोलीस बिनूच्या घराशेजारी असणाऱ्या ‘मीनाचील’ नदीत शोध घेत आहेत. घर सोडताना मेसीच्या या चाहत्याने एक सुसाईड नोटही लिहिली आहे. ‘या जगात पाहण्यासारखं आता काहीच उरलं नाही,’असं या सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आलं आहे.

पालकांच्या म्हणण्यानुसार, मेसीचा कट्टर चाहता असलेला बिनू काल रात्री फिफा विश्वचषकातील अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया ही मॅच पाहत होता. पण पहाटे चार वाजल्यापासून तो गायब आहे.

‘बिनू मेसीचा कट्टर चाहता होता. त्याने स्वत:च्या मोबाईल वॉलपेपरवरही मेसीचाच फोटो ठेवला होता,’ अशी माहिती तरूणाच्या जवळच्या नातेवाईकांनी दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच त्याने कालच मेसीचे चित्र असणारा टी-शर्ट खरेदी केला. हा टी-शर्ट घालूनच बिनू अॅलेक्स मॅच पाहायला बसला होता, अशीही माहिती पोलीसांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे मीनाचील नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे,त्यामुळे पोलिसांना अद्यापही या तरुणाचा शोध लागू शकला नाही.