रांची : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपलं लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफीवर केंद्रीत केलं असून, या स्पर्धेतली कामगिरीच धोनीचं भवितव्य निश्चित करेल असे संकेत त्याचे बालपणीचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनी दिले आहेत.

जून महिन्यात इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं जाणार आहे. धोनीने त्या स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावली, तर तो 2019 सालच्या वन डे विश्वचषकापर्यंत खेळू शकतो, असं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

2014 साली धोनीने कसोटीतून अचानक निवृत्ती जाहीर केली होती. तर यंदा वर्षाच्या सुरुवातील त्याने भारताच्या वन डे संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. गेल्या काही वर्षांत धोनीचा स्ट्राईक रेट घटला आहे, पण त्याची खेळाची जाण अजूनही उत्तम आहे. त्यामुळं तो आणखी काही काळ खेळत राहू शकतो, असा विश्वास बॅनर्जी यांनी व्यक्त केला.