या सामन्यात हार्दिक पंड्यापासून कुलदीप यादवपर्यंत सर्वांनीच आपली चमक दाखवली. पण भारतीय गोलंदाजीच्यावेळी एक वेळ अशी आली की, विराट कोहलीला एक चुकीचा निर्णय घेण्यापासून स्वत: धोनीही रोखू शकला नाही.
टीम इंडियाच्या 275 धावांचा पाठलाग करताना द. आफ्रिकेने 16 षटकात 3 गडी गमावून 85 धावा केल्या होत्या. त्यावेळी खेळपट्टीवर हाशिम आमला आणि स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलर होते. तर समोर भारताचा यशस्वी फिरकीपटू यजुवेंद्र चहल गोलंदाजी टाकत होता.
चहलने आपल्या ओव्हरमधील चौथ्या चेंडू जरा जास्त वळवला आणि तो थेट मिलरच्या पॅडवर जाऊन आदळला. यानंतर चहल, कर्णधार कोहली आणि सर्व खेळाडूंनी LBW साठी अपील केलं. पण पंचांनी हे अपील फेटाळून लावत मिलरला नाबाद ठरवलं.
यावेळी चहल कर्णधार कोहली आणि धोनीच्या दिशेने जात डीआरएसबाबत चर्चा करु लागला. त्यावेळी विराटने वेळ न गमावता धोनीकडे पाहिलं आणि धोनीनेही डीआरएससाठी हो म्हटलं.
धोनीच्या निर्णयावर कायम विश्वास असलेल्या विराटनेही धोनीचा म्हणणं मान्य करत डीआरएस घेतला. पण डीआरएसमध्ये चेंडू स्टम्पला लागत नसल्याचं दिसून आलं आणि भारताने आपला रिव्ह्यूही गमावला.
हा निर्णय पाहून स्वत: कोहली हैराण झाला. तर दक्षिण आफ्रिकेच्या ड्रेसिंग रुममध्येही आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. कारण पहिल्यांदा पाहणाऱ्या प्रत्येकाला मिलर बाद असल्याचं वाटत होतं. पण डीआरएसने सगळ्यांनाच चकवा दिला.
धोनी कायमच योग्य वेळी डीआरएस घेतो असं म्हटलं जातं. किंबहुना धोनीने अनेकदा घेतलेले डीआरएस बरोबर असतात. पण यावेळेस मात्र, धोनीचा निर्णय चुकला. त्यानंतर सोशल मीडियावर या एकूण सगळ्या प्रकारावर चाहत्यांनी धोनीला थोडसं ट्रोलही केलं.
पाहा ट्विपल्सने धोनीला कसं ट्रोल केलं?