नवी दिल्ली : ''टीम इंडियाचा विकेटकीपर महेंद्रसिंह धोनी 2019 च्या विश्वचषकापर्यंत संघाचा अविभाज्य घटक असेल. कारण, त्याचा पर्याय म्हणून ज्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली, ते त्याच्या आसपासही नाहीत'', असं निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे.


युवा खेळाडू ऋषभ पंत निवडकर्त्यांच्या नजरेत नसल्याचं एमएसके प्रसाद यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट झालं आहे. संघातील दुसरा विकेटकीपर म्हणून सध्या दिनेश कार्तिकचा समावेश करण्यात आला आहे.

धोनीच्या कामगिरीवर एमएसके प्रसाद यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांनी हे स्पष्ट केलं की, ''सध्या भारतीय अ संघातील काही यष्टीरक्षकांना तयार केलं जात आहे. मात्र आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर धोनीला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर काही यष्टीरक्षकांना तयार केलं जाईल''.

''धोनी सध्या जगातील सर्वोत्कृष्ट विकेटकीपर आहे आणि असं नेहमीच बोललं जातं. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याने स्टम्पिंगसोबत अप्रतिम झेल टिपले आहेत'', असं एमएसके प्रसाद यांनी सांगितलं.

''भारतीय क्रिकेट सोडा, जगभरातही धोनीच्या आसपास कोणता विकेटकीपर नाही'', असं एमएसके प्रसाद म्हणाले.

एमएसके प्रसाद यांच्या या संकेतांमुळे ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांच्या पुनरागमनाची शक्यता कमीच दिसत आहे, जे धोनीचे उत्तराधिकारी मानले जातात. ''हे खेळाडू अजून त्या स्तरापर्यंत पोहोचलेले नाहीत, ज्याची त्यांच्याकडून अपेक्षा होती. त्यांना अजूनही भारतीय अ संघात संधी दिली जाईल आणि कामगिरी पाहिली जाईल'', असं एमएसके प्रसाद म्हणाले.

एमएसके प्रसाद यांनी ऑगस्टमध्ये जे वक्तव्य केलं होतं, त्याच्या अगदी उलट हे स्पष्टीकरण दिलं आहे. धोनीची कामगिरी चांगली नसेल, तर त्याचा पर्याय शोधला जाईल, असं एमएसके प्रसाद यांनी ऑगस्ट महिन्यात म्हटलं होतं.