कोलंबो : भारत आणि श्रीलंका संघांमधला चौथा वन डे सामना उद्या (गुरुवार) कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीतला हा तीनशेवा वन डे सामना असेल. त्यामुळे या सामन्यात धोनी कशी कामगिरी बजावतो, ही टीम इंडियाच्या चाहत्यांची मुख्य उत्सुकता राहिल.

कॅण्डीच्या लागोपाठ दोन वन डे सामन्यांमध्ये मॅचफिनिशरची भूमिका बजावणारा टीम इंडियाचा विघ्नहर्ता महेंद्रसिंग धोनी आता 'क्लब थ्री हण्ड्रेड'मध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झालाय.

भारत आणि श्रीलंका संघांमध्ये कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येणारी चौथी वन डे ही धोनीच्या कारकीर्दीतली तीनशेवी वन डे आहे. वन डे क्रिकेटच्या इतिहासात एक सर्वोत्तम मॅचफिनिशर अशी धोनीची ओळख आहेच. पण कोलंबोत आणखी एक जबरदस्त कामगिरी बजावून वन डे सामन्यांचं त्रिशतक साजरं करण्याचा धोनीचा इरादा राहिल.

भारताच्या वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात सामन्यांचं त्रिशतक साजरं करणारा धोनी हा सहावा शिलेदार ठरेल. याआधी सचिन तेंडुलकरने 463, राहुल द्रविडने 344, मोहम्मद अझरुद्दिनने 334, सौरव गांगुलीने 311 आणि युवराज सिंहने 304 वन डे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्या रथीमहारथींच्या 'क्लब थ्री हण्ड्रेड'मध्ये आता धोनीची एण्ट्री होईल.

धोनीमधल्या आक्रमकतेची धग ही वाढत्या वयानुसार कमी झाली असली तरी त्याच्यामधला मॅचफिनिशर अजूनही जागता असल्याचं कॅण्डीतल्या लागोपाठ दोन्ही वन डे सामन्यांमध्ये दिसून आलं. टीम इंडिया संकटात सापडलेली असताना त्याने दुसऱ्या वन डेत नाबाद 45 आणि तिसऱ्या वन डेत नाबाद 67 धावांची खेळी उभारून आपली उपयुक्तता सिद्ध केली.

विशेष म्हणजे या दोन्ही खेळींदरम्यान त्याने अनुक्रमे भुवनेश्वर कुमार आणि रोहित शर्माच्या हाती सूत्रं देऊन स्वतः दुय्यम भूमिका स्वीकारली. तोच धोनी कारकीर्दीतल्या तीनशेव्या वन डेत कशी कामगिरी बजावतो, ही टीम इंडियाच्या चाहत्यांची उत्सुकता असेल.

कॅण्डीच्या दोन्ही वन डे सामन्यांमध्ये धोनीच्या कामगिरीइतकीच अधोरेखित झालेली दुसरी बाब म्हणजे भारताच्या मधल्या फळीचं अकिला धनंजयसमोरचं अपयश. लोकेश राहुल हा मूळचा सलामीचा फलंदाज असल्याचं सांगून चौथ्या क्रमांकावर त्याच्या निराशाजनक कामगिरीचा बचाव करण्यात येत आहे. पण केदार जाधवच्या अपयशाबाबत प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं आहे.

अर्थात, केदारचा पर्यायी ऑफ स्पिनर म्हणून होणारा वापर, त्याला वाचवूही शकतो. पण पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने घेतलेली 3-0 अशी विजयी आघाडी पाहता, चौथ्या आणि पाचव्या वन डेसाठी भारतीय संघात मोठ्या बदलांची शक्यता आहे.  कारण अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, कुलदीप यादव आणि शार्दूल ठाकूरसारखे खेळाडू अजून बसून आहेत.