नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या निवृत्तीबाबत नेहमीच चर्चा होते. पण धोनीचा फिटनेस पाहिला, तर धोनीमध्ये आजही पूर्वीचीच क्षमता असल्याचं दिसून येतं. कारण नुकत्याच झालेल्या बीसीसीआयच्या यो-यो फिटनेस टेस्टमध्ये धोनीने अनेक युवा खेळाडूंनाही मागे सोडलं आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी संघ निवडण्यापूर्वी बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत खेळाडूंची फिटनेस टेस्ट घेण्यात आली. यामध्ये 19.2 गुणांसह मनिष पांडे संघातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू ठरला. तर कर्णधार विराट कोहली 19 गुणांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आणि धोनी तिसऱ्या स्थानावर आहे.
36 वर्षीय धोनीने या फिटनेस टेस्टमध्ये अनेक युवा खेळाडूंनाही मागे सोडलं. तर दुसरीकडे युवराज सिंह आणि सुरेश रैना या टेस्टमध्ये अपात्र ठरल्यामुळे त्यांना संघातून विश्रांती देण्यात आली, अशी माहिती निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी दिली.
फिटनेसमुळे युवराजला विश्रांती देण्यात आली. बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये युवराज पात्र ठरु शकला नाही. बीसीसीआयच्या या यो-यो टेस्टमध्ये पात्र ठरण्यासाठी कमीत कमी 16 गुणांची आवश्यकता असते, मात्र युवराजला केवळ 13 गुण मिळाले.
बीसीसीआयच्या या टेस्टसाठी जे खेळाडू भारतात उपलब्ध नव्हते, त्यांच्यासाठी श्रीलंकेतील कॅण्डीमध्ये यो-यो टेस्टचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक दिवसांपासून संघातून बाहेर असलेला सुरेश रैनाही या टेस्टमध्ये पात्र ठरु शकला नाही.
वय नाही, फिटनेस पाहा, धोनी युवा खेळाडूंपेक्षाही तंदुरुस्त!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Aug 2017 11:44 AM (IST)
श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेपूर्वी खेळाडूंची फिटनेस टेस्ट घेण्यात आली. यामध्ये धोनी भारतीय संघातील सर्वात तंदुरुस्त असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -