गुवाहटी : टीम इंडियाचा स्मार्ट विकेटकीपर कोण? असं म्हटलं तर महेंद्रसिंह धोनी हे नाव सर्वप्रथम आपल्या ओठावर येतं. मोठ्या चपळतेनं धोनीनं अनेक दिग्गज फलंदाजांना आतापर्यंत माघारी धाडलं आहे. पण कालच्या सामन्यात ज्या पद्धतीनं धोनी बाद झाला त्यावरुन सध्या बरीच चर्चा सुरु आहे.

ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या टी-20 सामन्यात 8 गडी राखून भारतावर मात केली. या सामन्यात भारताचा एकही फलंदाज आपली चमक दाखवू शकला नाही. त्यामुळे टीम इंडिया फक्त 118 धावांपर्यंतच मजल मारु शकली.

दरम्यान, या सामन्यात अॅडम झम्पाच्या एका अप्रतिम चेंडूवर धोनी चक्क स्टम्पिंग झाला.

दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.  कांगारुंनी सुरुवातीलाच भारताचे चार महत्त्वाचे फलंदाज बाद केले. त्यामुळे संघाला या संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी केदार जाधव आणि धोनीच्या खांद्यावर आली. धोनी जेव्हा मैदानात उतरला तेव्हा भारताचा स्कोअर 27/4 होता. त्यानंतर दोघांनी 33 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला सावरण्याचा प्रयत्नही केला.

पण 10व्या षटकात धोनी झम्पाच्या चेंडूवर फसला आणि आपली विकेट गमावून बसला. या षटकात धोनीनं चारही चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पाचवा चेंडूही तो अशाच पद्धतीनं खेळण्यास गेला. पण झम्पानं चेंडू असा काही वळवला की, धोनी क्रिझमध्ये परतूच शकला नाही... धोनी पहिल्यांदा स्टम्पिंग झाला.

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये धोनी पहिल्यांदाच स्टम्पिंग झाला. आतापर्यंत धोनी एकूण 80 टी-20 सामने खेळला. पण तो कधीही स्टम्पिंग झाला नव्हता. मात्र, यावेळी झम्पानं चकवलं आणि धोनीही त्याच्या जाळ्यात अलगद सापडला. या सामन्यात धोनीनं अवघ्या 13 धावा केल्या.

VIDEO :


संबंधित बातम्या :

गुवाहाटी टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव