मुंबई : वाढत्या वयासोबत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीला त्याच्या फॉर्मवरुन अनेकदा लक्ष्य केलं जातं. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न धोनीच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे. धोनीला कुणासमोरही स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही, असं वॉर्नने म्हटलं आहे.
आयपीएलच्या दहाव्या मोसमात पुणे सुपरजाएंटच्या कर्णधार पदावरुन हटवल्यानंतर धोनीला आतापर्यंत खास कामगिरी बजावता आलेली नाही. त्याने पाच सामन्यात केवळ 61 धावा केल्या आहेत.
धोनीला कुणासमोरही स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. तो सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये उत्कृष्ट खेळाडू आहे. शिवाय उत्कृष्ट कर्णधार आणि अनेकांना प्रेरणा देणारा खेळाडू आहे, असं वॉर्नने म्हटलं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध खेळलेल्या सामन्यात 28 धावांची खेळी करुन धोनीने फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिले आहेत. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी धोनीचा फॉर्म टीम इंडियासाठी महत्वाचा आहे.