लंडन : विराट कोहलीच्या टीम इंडियाने ब्रिस्टलच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात इंग्लंडचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडवर 2-1 अशी मात केली.

या सामन्यात इंग्लंडने भारताला विजयासाठी 199 धावांचं भलंमोठं आव्हान दिलं होतं. रोहित शर्माने ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या कारकीर्दीतलं तिसरं शतक ठोकून भारताला हा सामना आणि मालिका जिंकून दिली.

नुकताच 500 सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहभागी झालेल्या महेंद्रसिंह धोनीने या सामन्यात दोन विक्रमांना गवसणी घातली. एकाच सामन्यात पाच झेल घेणारा धोनी एकमेव खेळाडू ठरला. शिवाय टी-20 मध्ये 50 पेक्षा जास्त खेळाडूंना माघारी धाडणारा तो एकमेव खेळाडू झाला आहे.

धोनीने आपल्या 93 व्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात एकूण पाच झेल घेतले. त्याच्या नावावर एकूण 54 झेल झाले आहेत.

दीपक चहरच्या गोलंदाजीवर जेसन रॉयचा झेल घेतला तेव्हा धोनीने आपल्या झेल घेण्याचं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर त्याने अॅलेक्स हेल्स, इयॉन मॉर्गन, जॉनी बेअरस्टो आणि लिएम प्लंकेट यांचा झेल घेतला.

संबंधित बातम्या :

हिटमॅन रोहित शर्माने भारतासाठी टी-20 मध्ये इतिहास रचला!

रोहित शर्माचं वादळी शतक, भारताने टी-20 मालिका जिंकली