सेन्चुरियन : महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीपाठी 600 झेलांचा टप्पा गाठला आहे. यष्टिरक्षक या नात्याने 600 झेल पकडणारा धोनी जगातला केवळ तिसरा क्रिकेटर ठरला आहे.


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सहाव्या वन डेत त्याने हाशिम अमलाचा झेल घेऊन या विक्रमाला गवसणी घातली. धोनीने आजवर यष्टीपाठी कसोटीत 256, वन डेत 297 आणि टी-20 मध्ये 47 झेल टिपले आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या मार्क बाऊचरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीपाठी सर्वाधिक 953 झेल टिपले आहेत. ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट 813 झेल घेऊन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

सेन्चुरियन वन डेत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या 205 धावांचा पाठलाग करत 8 विकेट्सने विजय मिळवला. कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात वन डे कारकीर्दीतलं 35 वं शतक पूर्ण केलं. त्याने 96 चेंडूंत 19 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 129 धावांची खेळी उभारली.