कोलंबो : टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज शिखर धवननं त्याच्या आईच्या आजारपणामुळं श्रीलंका दौऱ्यातून माघार घेतली आहे. त्यामुळं या दौऱ्यातल्या अखेरच्या वन डे सामन्यात आणि एकमेव ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात तो खेळू शकणार नाही.

बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार, शिखर धवन रविवारच्या विमानानं मायदेशी रवाना होईल.  शिखर धवन मायदेशी परतत असला तरी त्या जागी अद्याप कोणत्याही खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही. हा दौरा शिखरशी बराच चांगला ठरला. या दौऱ्यात त्यानं 3 शतकं ठोकली.

श्रीलंका दौऱ्यावरच्या भारतीय संघात धवन आणि रोहित शर्मासह लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणे या सलामीच्या आणखी दोन फलंदाजांचा समावेश आहे. त्यामुळं शिखर धवनऐवजी भारतीय संघात कुणाचाही समावेश करण्यात आलेला नाही.