धर्मशाला: धर्मशाला कसोटीत भारतनं ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवत 2-1नं मालिकाही खिशात टाकली. या संपू्र्ण मालिकेत दोन्ही संघात बरेच खटकेही उडाल्याचं पाहायला मिळालं.


पहिल्या कसोटीपासून ते शेवटच्या कसोटीपर्यंत प्रत्येक सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंकडून स्लेजिंगही पाहायला मिळाल. दरम्यान, चौथ्या आणि निर्णायक कसोटीत भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा आणि ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक मॅथ्यू वेड यांच्यामध्ये देखील काल बरंच स्लेजिंग पाहायला मिळालं.

धर्मशाला कसोटीत तिसऱ्या दिवशी भारतीय संघ अडचणीत असताना वृद्धीमान साहा आणि रविंद्र जाडेजा यांनी मोक्याच्या क्षणी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. या दोघांनाही लवकरात लवकर बाद करुन भारताला बॅकफूटवर ढकलावं यासाठी ऑस्ट्रेलियानं बरेच प्रयत्नही केले. पण त्यात ते यशस्वी झाले नाही.

जाडेजा आणि साहा यांची संयमी फलंदाजी पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडू बरेच वैतागले. त्यानंतर त्यांनी आपलं पारंपारिक अस्त्र उपसलं. त्यांनी जाडेजाला टार्गेट करुन स्लेजिंग सुरु केलं. पण जाडेजा त्यांच्या या स्लेजिंगला अजिबात बळी पडला नाही.

एकवेळ मॅथ्यू वेड यानं अक्षरश: हद्दच केली. त्यावेळी या सर्व प्रकारात मैदानावरील पंचांना हस्तक्षेप करावा लागला. जेव्हा वेड जाडेजाला वारंवार डिवचत होता. त्यावेळी जाडेजानं त्याला फक्त इतकंच उत्तर दिलं. 'तू फक्त बोलत राहा, मी मारत राहतो.' त्यानंतर जाडेजानं शानदार अर्धशतक झळकावत वेडला चोख उत्तर दिलं. जाडेजा-साहाच्या भागीदारीनं भारताला 32 धावांची निर्णायक आघाडीही मिळवून दिली.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 137 धावांवर बाद झाला. त्यामुळे भारतासमोर जिंकण्यासाठी अवघ्या 106 धावांचं सोपं आव्हान होतं. भारतानं दोन गड्यांच्या बदल्यात ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सनी विजय मिळवला.

VIDEO:



संबंधित बातम्या:

IndvsAus : टीम इंडियाची विजयाची गुढी, ऑस्ट्रेलियाला लोळवलं!


सामना हरल्यानंतर डिनरला ये, जाडेजाचं मॅथ्यू वेडला निमंत्रण

मुरली विजयला शिवी देताना स्मिथ कॅमेऱ्यात कैद

मुरली विजयबद्दल चुकीने अपशब्द निघाला, स्मिथचा माफीनामा

कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत विजय, रहाणे नववा भारतीय