शिर्डी: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्याची कर्जमाफी करुन सरकारनं गुढी उभारावी, असं मत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केलं आहे. ते शिर्डीत पत्रकारांशी बोलत होते.


कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन सरकारविरोधात 29 तारखेला संघर्षयात्रा काढली जाणार आहे. शेतकरी विरोधी धोरणांविरोधात या संघर्षयात्रेतून निषेध करण्यात येणार असल्याचं विखें पाटील यांनी म्हटलं. इतकचं नाही तर 19 आमदारांच्या केलेल्या निलंबनावरुनही त्यांनी भाजप सरकारवर टीका केली.

‘सेनेच्या मंत्र्यांनी महापालिकेची सत्ता मिळेपर्यंतच राजीनामे खिशात ठेवले होते’

‘शिवसेनेचा हेतू हा शंकास्पद असून महापालिकेची सत्ता मिळेपर्यंतच राजीनामे खिशात ठेवले गेले. नंतर या राजीनाम्याचं काय झालं?, शिवसेनेला शेतकऱ्यांचा कळवळा फक्त मुंबई महापालिकेची सत्ता मिळविण्याकरिता होता. राज्यात शेतकऱ्यांना मारहाण होत असताना शिवसेना गप्प का?’ असा प्रश्न विचारला.

‘सरकार कोणाची समृद्धी करणार?’

‘राज्यात सरकार शेतकरी विरोधीच भूमिका घेतांना दिसतं आहे. मुंबई-नागपूर हा जुना महामार्ग अस्तित्वात असतांना केवळ फक्त मूठभर लोकांना समृद्धी महामार्गाचा फायदा देण्यासाठीच राज्य सरकारचा प्रयत्न असल्याच दिसून येतं आहे. शेतकरी भूमिहीन होणार असून शेतकऱ्याला भिकेला लावून सरकार कोणाची समृद्धी करणार?’ असा सवालही विखे-पाटलांनी केला

‘नारायण राणेंनी पक्षांतर्गत चर्चा करावी’

यावेळी बोलताना विखे-पाटलांनी नारायण राणेंबाबतही प्रतिक्रिया दिली. ‘नारायण राणे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी पक्षातील मुद्द्यावर जाहीर वक्तव्य करण्यापेक्षा पक्षांतर्गत चर्चा करावी. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यापेक्षा अशी वक्तव्य टाळली पाहिजे.’ असा सल्ला  विखे-पाटलांनी नारायण राणेंना दिला आहे.