नवी दिल्ली : भारतात खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरता अनेस उपक्रम राबवले जातात, पण हे सारं कागदोपत्रीच आहे का? आणि मूळात परिस्थिती काही वेगळीच आहे का? असा प्रश्न दिल्लीतील एका घटनेमुळे समोर आला आहे. दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये आयएएस ऑफिसर (IAS Officer) संजीव खिरवार यांना त्यांच्या श्नानासोबत फिरण्याकरता चक्क खेळाडूंना लवकर मैदानाबाहेर काढलं जात असल्याचं समोर आलं आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तातून ही संपूर्ण बाब समोर आली आहे.


नेमकं प्रकरण काय?


समोर आलेल्या माहितीनुसार दिल्लीचे प्रमुख सचिव आयएएस संजीव खिरवार हे 7.30 च्या सुमारास त्यांच्या श्वानासह फिरण्याकरता दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये येत असतात. त्यामुळे 7 वाजताच त्याठिकाणी सराव करणाऱ्या खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं जातं. दरम्यान या साऱ्याबाबत खेळाडू आणि प्रशिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका कोचने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीत सांगितलं की, 'आधी याठिकाणी 8, 8.30 पर्यंत अॅथलिट्स सराव करत असत, पण आता 6.30 वाजल्यापासूनच तेथील गार्ड्स शिट्टी वाजवण्यास सुरुवात करतात आणि मैदान मोकळं केलं जातं. त्यामुळे आता त्यांना 3 किमीवरील जवाहरनगर स्टेडियममध्ये जावं लागत आहे.' विशेष म्हणजे संजीव यांचा कुत्रा मैदानात रेसिंग ट्रॅक, फुटबॉलचं मैदान साऱ्यावर फिरत असल्याचंही निदर्शनास आलं आहे.


IAS म्हणतात हे साफ खोटं  


या साऱ्या प्रकरणाबाबत आयएएस संजीव खिरवार यांच्याशी संपर्क केला असता हा साफ चूकीचा आरोप असल्याचं ते म्हटले आहेत. संजीव यांनी 'मी कधी कधी माझ्या श्वानाला फिरवण्यासाठी मैदानावर घेऊन जातो. पण त्याने खेळाडूंना कोणता त्रास होणार नाही, याचीही काळजी घेतो.' असं म्हटलं आहे.


मैदानांची वेळ वाढवणार


दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. ज्या खेळाडूंना उशिरापर्यंत सराव करायचा आहे, अशा साऱ्यांसाठी दिल्लीतील मैदानांची वेळ रात्री 10 पर्यंत वाढवली आहे.



हे देखील वाचा-