नवी दिल्ली: दिल्ली वन डेत न्यूझीलंडनं भारताला विजयासाठी 243 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात केन विल्यमसनच्या झुंजार शतकी खेळीनंतरही भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला 50 षटकांत 9 बाद 242 धावांवर रोखण्याची कामगिरी बजावली.
विल्यमसननं 128 चेंडूंत 118 धावांची झुंजार खेळी केली. तर भारताकडून अमित मिश्रा आणि जसप्रीत बुमरानं प्रत्येकी तीन विकेट्स काढल्या. तर उमेश यादव, केदार जाधव आणि अक्षर पटेलनं एक-एक विकेट काढली.
या सामन्यात धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.उमेश यादवनं उमेशनं मार्टिन गप्टिलला भोपळाही फोडू दिला नाही. सामन्यात सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर उमेशनं गप्टिलचा त्रिफळा उडवला. त्यामुळं किवी टीमची अवस्था एक बाद शून्य अशी झाली होती.
मग कर्णधार केन विल्यमसन आणि सलामीवीर टॉम लॅथमनं अर्धशतकी भागीदारी रचून न्यूझीलंडचा डाव सावरला .
त्यानंतरकेदार जाधवनं धरमशालापाठोपाठ दिल्लीच्या मैदानातही गोलंदाजीत आपला ठसा उमटवला. केदारनं टॉम लॅथमला 46 धावांवर बाद केलं आणि भारताला दुसरा ब्रेक थ्रू मिळवून दिला. लॅथम आणि केन विल्यमसननं 120 धावांची भागीदारी रचून न्यूझीलंडचा डाव सावरला. अखेर केदार जाधवनं ती जोडी फोडली.
*********************************************
पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियानं धरमशालाच्या पहिल्या वन डेत मिळवलेला मोठा विजय लक्षात घेता, दिल्लीच्या दुसऱ्या वन डेसाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता वाटत नाही. तापातून सावरलेला सुरेश रैना अजूनही पुरेसा फिट नाही. त्यामुळं दुसऱ्या वन डेसाठी रैनाच्या नावाचा विचार करण्यात येणार नसल्याचं बीसीसीआयनं आधीच स्पष्ट केलं आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वा. सामना सुरु होईल.
सलामीवीर रोहित शर्मा, तसंच मधल्या फळीत मनीष पांडे आणि महेंद्रसिंग धोनी हे तिघंही दुसऱ्या वन डेत मोठी खेळी उभारून धरमशालामधील अपयश धुवून काढण्याचा प्रयत्न करतील. दुसरीकडे पहिल्या वनडेत विराट कोहलीनं नाबाद 85 धावांची खेळी करून आपला फॉर्म पुन्हा दाखवून दिला आहे.
पहिल्या वन डेत हार्दिक पंड्या आणि उमेश यादव यांना मध्यमगती गोलंदाज, तर अमित मिश्रा आणि केदार जाधव यांना फिरकी गोलंदाज म्हणून मिळालेलं यश वाखाणण्याजोगं होतं. केदार जाधवसारख्या पार्टटाईम ऑफ स्पिनरनं चक्क दोन विकेट्स काढून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मध्यमगती गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि डावखुरा स्पिनर अक्षर पटेल यांना विकेट्स मिळाल्या नसल्या तरी त्या दोघांनीही त्यांना देण्यात आलेली भूमिका चोख बजावली.
दरम्यान, धोनीनं कसोटी क्रिकेटला रामराम ठोकून वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केलं आहे. पण मॅचफिनिशर किंवा यशस्वी कर्णधार या नात्यानं एका जमान्यात असलेला धोनीचा महिमा आज हरवलेला दिसत आहे. त्यात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतानं न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 3-0 असा निर्भेळ विजय संपादन केला. त्या कसोटी मालिकेत आणि पाठोपाठ धर्मशालाच्या पहिल्या वन डेत एक फलंदाज म्हणून विराटची बॅट तळपली. मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्येही आता विराटला नेतृत्त्वाची संधी द्यायला हवी, अशी भावना देशभरात बळावू लागली आहे. त्यामुळं साहजिकच धोनीवर एक मॅचविनर आणि एक कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याचं दडपण वाढत चाललं आहे.
एक मॅचफिनिशर फलंदाज आणि यशस्वी कर्णधार म्हणून आपला महिमा आजही कायम असल्याचं धोनीला दिल्लीच्या दुसऱ्या वन डेत सिद्ध करावं लागणार आहे.