दिल्ली : दिल्ली डेअरडेव्हिल्सने सनरायझर्स हैदराबादवर 6 विकेट्स राखून मात करत यंदाच्या आयपीएलमधला तिसरा विजय नोंदवला. तर जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या हैदराबादचा विजयरथही रोखला.


हैदराबादने दिल्लीला विजयासाठी 186 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान दिल्लीच्या फलंदाजांनी सहजरित्या पार केलं. संजू सॅमसन (24), करुन नायर (39), रिषभ पंत (34), श्रेयस अय्यर (33), कोरी अँडरसन (41) आणि ख्रिस मॉरिस (15) या सर्वच फलंदाजांनी दिल्लीच्या विजयात महत्वाची भूमिका निभावली.

दरम्यान दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर आज युवराज सिंगची बॅट तळपली. युवराजने 41 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 70 धावांची खेळी उभारली.

युवराजने मोझेस हेन्रिक्ससह चौथ्या विकेटसाठी 93 धावांची अभेद्य भागीदारीही रचली. हेन्रिक्सने 18 चेंडूंमध्ये 25 धावांची खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नरने 30, शिखर धवनने 28 आणि केन विल्यमसनने 24 धावा फटकावल्या.  त्या जोरावरच हैदराबादने 20 षटकांत तीन बाद 185 धावांची मजल मारली.