नवी दिल्ली: संजू सॅमसन आणि ऋषभ पंतनं दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या 63 चेंडूंमध्ये केलेल्या 143 धावांच्या भागिदारीनं दिल्लीला आयपीएलच्या सामन्यात गुजरातवर सात विकेट्सनी सनसनाटी विजय मिळवून दिला. या पराभवामुळे गुजरात लायन्सचं आयपीएलमधील आव्हान जवळजवळ संपुष्टात आलं आहे.


दिल्लीचा हा दहा सामन्यांमधला चौथा विजय ठरला. कोटला स्टेडियमवरच्या या सामन्यात गुजरातनं दिल्लीला विजयासाठी 209 धावांचं भलंमोठं आव्हान दिलं होतं. पण सॅमसन आणि पंतनं दुसऱ्या विकेटसाठी 63 चेंडूंत केलेल्या 143 धावांच्या भागिदारीनं त्या आव्हानातली हवाच काढून घेतली.

ऋषभ पंतचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. त्यानं 43 चेंडूंत सहा चौकार आणि नऊ षटकारांसह 97 धावांची खेळी करून दिल्लीला विजयपथावर नेऊन ठेवलं. सलामीच्या संजू सॅमसननं 31 चेंडूंत सात षटकारांसह 61 धावांची खेळी करून दिल्लीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.