मुंबई : भारताचे टेनिस्टार लिअँडर पेस आणि महेश भूपती यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. उझबेकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस कपमध्ये लिअँडर पेसला स्थान न मिळल्यानं दोघांमधील वाद उफाळून आला.

इतकंच नाही तर पेससोबतच्या व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीन शॉट भूपतीने फेसबुकवर अपलोड केला आहे.

काय आहे वाद?

उझबेकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस कप लढतीत भारताकडून कोण कोण मैदानात उतरणार यावरुन हा वाद आहे.

पेस-भूपतीच्या व्हॉट्सअॅप चॅटनुसार, महेश भूपतीने लिअँडर पेसऐवजी रोहन बोपण्णाला पसंती दिली आहे. त्यामुळेच भारताकडून मैदानात उतरायला न मिळण्याच्या शक्यतेने पेस अत्यंत नाराज झाला आहे.

मात्र पेसला संघाबाहेर ठेवण्यामागे कोणताही वैयक्तिक हेतू नाही, असं भूपतीने म्हटलं आहे. याबाबतच पेससोबत 5 मार्चला झालेलं व्हॉट्सअॅप चॅट भूपतीने फेसबुकवर सार्वजनिक केलं आहे.

व्हॉट्सअॅप चॅट फेसबुकवर



भूपतीच्या म्हणण्यानुसार, अद्याप संघ निश्चित झालेला नाही, मात्र बंगळुरुतील परिस्थितीसाठी रोहन बोपण्णा योग्य आहे.

मात्र पेसने याबाबत भूपतीवर भेदभावाचा आरोप केला होता. मात्र आता व्हॉट्सअॅप चॅटचा हा फोटो फेसबुकवरुन डिलीट करण्यात आला आहे.



भूपतीने फेसबुकवर काय म्हटलंय?

20 वर्षांच्या कारकीर्दीत माझा तथ्यांवर विश्वास आहे. मी सातत्याने प्रतिक्रिया देणं टाळतो, कारण मीडिया त्याला वैयक्तिक शत्रूता मानते. मला सर्वात आधी हे स्पष्ट करायचं आहे की ही कोणतीही वैयक्तिक दुश्मनी नाही.

मी 1994 मध्ये डेव्हिस कप टीममध्ये सहभागी झालो, तेव्हा मी लिअँडर पेसचा फॅन होतो. त्यावेळी त्याला वेन फरेराविरुद्ध खेळताना भारावून गेलो होतो. तो जगातील दहाव्या क्रमांकाचा खेळाडू होता.

पेसने त्याला सरळ सेटमध्ये हरवलं होतं. त्यानंतर मी त्याचा आणखी मोठा चाहता बनलो. टेनिसशिवाय मीडिया आणि टेनिस जगतात त्याच्याबद्दल आकर्षण होतं.

त्यानंतर घटना वेगाने बदलत गेल्या. मी गेल्या काही वर्षांतील घडामोडींबाबत पुस्तक लिहू शकलो असतो, मात्र मी हे माझ्यापुरतंच ठेवू इच्छितो.