David Warner : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिली कसोटी पर्थमध्ये खेळवली जात आहे. पर्थ कसोटीचा पहिला दिवस यजमान ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी 5 गड्यांच्या मोबदल्यात 346 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने कारकिर्दीमधील शेवटची कसोटीत शानदार दीडशतकी तडाखा दिला. 






डेव्हिड वॉर्नरने 211 चेंडूत 164 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 16 चौकार आणि 4 षटकार मारले. या शतकाने डेव्हिड वॉर्नरने त्याच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने आपली प्रतिक्रिया दिली.






'माझे काम ऑस्ट्रेलियासाठी धावा करणे आहे'


डेव्हिड वॉर्नर म्हणाला की, माझे काम ऑस्ट्रेलियासाठी धावा करणे आहे. असो, माझ्या संघासाठी शतक झळकावल्याचा मला आनंद आहे. तो म्हणाला की, शतकानंतरचे सेलिब्रेशन त्या लोकांसाठी होते जे कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन संघात माझ्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. ऑस्ट्रेलियासाठी कसोटी शतक झळकावणे ही नेहमीच आनंददायी भावना असते. पहिल्या डावात आम्हाला मोठी धावसंख्या करायची आहे, जेणेकरून आमच्या गोलंदाजांना चांगल्या संधी मिळतील.






'तुम्ही टीकेबद्दल काहीही करू शकत नाही, परंतु तुम्हाला...'


डेव्हिड वॉर्नर पुढे म्हणाला की, तुम्ही टीकेबद्दल काहीही करू शकत नाही, परंतु तुम्हाला तुमचे डोकं खाली घालून तुमचं काम सुरू ठेवावं लागेल. तो म्हणाला की, धावा करणे आणि टीकाकारांना शांत करणे यापेक्षा चांगले काहीही नाही. तत्पूर्वी, डेव्हिड वॉर्नरच्या शतकाशिवाय उस्मान ख्वाजाने 41 धावा केल्या. तर ट्रॅव्हिस हेडने 40 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून अमरे जमालला 2 यश मिळाले. शाहीन आफ्रिदी, खुर्रम शहजाद आणि फहीम अश्रफ यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.






इतर महत्वाच्या बातम्या