मुंबई : आयपीएलच्या दहाव्या मोसमातील अंतिम सामन्यापूर्वीच ऑरेंज कॅप विजेता निश्चित झाला आहे. सनरायझर्स हैदराबाद यावर्षी अंतिम सामन्यापर्यंत पोहोचली नसली तरी कर्णधार डेव्हिड वॉर्नर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

वॉर्नरने यंदाच्या आयपीएल मोसमात 14 सामन्यात 58.27 च्या सरासरीने 641 धावा ठोकल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. 141.81 च्या स्ट्राईक रेटने वॉर्नरने या धावा काढल्या.

अंतिम सामना खेळणाऱ्या मुंबई किंवा पुणे या संघापैकी एकाही संघाच्या खेळाडूने वॉर्नरपेक्षा जास्त धावा केलेल्या नाहीत. किंवा कुणीही खेळाडू वॉर्नरच्या धावसंख्येच्या आसपास नाही. पुण्याचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे.

स्मिथने 14 सामन्यात 38.27 च्या सरासरीने 421 धावा केल्या आहेत. वॉर्नरशी बरोबरी साधण्यासाठी स्मिथला अजून 220 धावांची गरज आहे.

सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये गौतम गंभीर (498), शिखर धवन (479) आणि गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैना (442) यांचा समावेश आहे.

मुंबईकडून यंदाच्या आयपीएल मोसमात सर्वाधिक धावा पार्थिव पटेलच्या खात्यात जमा आहेत. त्याने 15 सामन्यात 26.06 च्या सरासरीने 391 धावा ठोकल्या, ज्यामध्ये दोन अर्धशतकांचाही समावेश आहे. त्यामुळे यंदाचा ऑरेंज कॅप विजेता फायनलपूर्वीच निश्चित झाला आहे.