CWG 2022: भारताच्या बिंद्याराणी देवीनं (Bindyarani Devi) कॉमनवेल्थ क्रीडा 2022 मध्ये महिलांच्या 55 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकून शनिवारी भारताची पदकांची संख्या चारवर नेली. 114 किलो वजनाच्या दुसऱ्या क्लीन अँड जर्क प्रयत्नात ती अयशस्वी झाली. पण तिनं तिच्या अंतिम लिफ्टसह 116 किलो वजनाचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या स्थानावर जाण्यात यशस्वी ठरली. तिनं एकूण 202 किलो वजन उचललं. तिनं स्नॅच फेरीत 86 किलो आणि क्लीन अँड जर्क राऊंडमध्ये 116 किलो वजन उचलून कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेत विक्रम नोंदवला. फक्त एक किलो वजनानं तिचं सुवर्णपदक हुकलं.


बिंद्याराणी देवी काय म्हणाली?
कॉमनवेल्थ् क्रीडा 2022 च्या महिलांच्या 55 किलो वजनी गटात, वेटलिफ्टिंगमधील सुवर्णपदक नायजेरियाच्या अदिजत अदेनिके ओलारिनोयने आणि कांस्यपदक यजमान इंग्लंडच्या फेरर मोरोने जिंकले आहे. या विजयानंतर बिंदयाराणी देवी म्हणाली की, "माझे पुढील लक्ष्य राष्ट्रीय खेळ, विश्व चॅम्पियनशिप, आशियाई खेळ आणि त्यानंतर 2024 पॅरिस ऑलिम्पिक आहे."


वेटलिफ्टिंगमध्ये भारतानं चार पदक जिंकली
कॉमनवेल्थ 2022 मधील शनिवार हा भारतीय संघासाठी समाधानकारक ठरला आहे. वेटलिफ्टिंगमध्ये भारतानं एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांसह चार पदके जिंकली. भारतीय वेटलिफ्टर संकेत सरगरनं रौप्यपदक भारताचं खातं उघडलं. त्यानंतर गुरुराज पुजारीनं कांस्यपदक, मीराबाई चानूनं सुवर्णपदक आणि बिंद्याराणी देवीनं रौप्यपदक जिंकलं. 


वॉल्सविरुद्ध महिला हॉकी संघाचा दमदार विजय
कॉमनवेल्थ बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघ सातत्यानं दमदार प्रदर्शन करताना दिसत आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात घानाला धुळ चाखल्यानंतर भारतीय महिला संघानं वॉल्सचाही पराभव केलाय. वॉल्सविरुद्ध शनिवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघानं 3-1  अशा फरकानं विजय मिळवलाय. भारतीय महिला हॉकी संघाचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. 


टेबल टेनिसमध्ये महिला संघाचं आव्हान संपुष्टात
टेबल टेनिसमध्ये महिला संघाचा उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाविरुद्ध 2-3 असा पराभव झाला आणि त्यांचा प्रवास येथेच संपला.



हे देखील वाचा-