CSK vs SRH, IPL 2021 1st Innings Highlights: आयपीएलमधील दिल्लीत सुरु असलेल्या सामन्यात हैदराबादनं चेन्नईसमोर विजयासाठी 172 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना तीन बाद 171 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडेंच्या अर्धशतकाच्या बळावर हैदराबादनं आव्हानात्मक धावसंख्या उभारली आहे. 


डेविड वॉर्नरनं 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 55 चेंडूत 57 धावा केल्या.  तर मनिष पांडेनं 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 46 चेंडूत 61 धावांची खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 100 धावांची भागिदारी केली.  वॉर्नर आणि पांडे बाद झाल्यानंतर विलियमसननं 10 चेंडूत 26 धावांची खेळी करत संघाला सुस्थितीत नेले. 


चेन्नई विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. सॅम करनच्या गोलंदाजीवर बेअरस्टो 7 धावा करून बाद झाला.  त्यानंतर मनीष पांडे आणि वॉर्नरनं चांगली भागिदारी केली. आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकं करण्याचा मान डेविड वॉर्नरच्या नावावर आहे त्यानं आज चेन्नई विरोधात अर्धशतक झळकावून त्याने स्पर्धेतील 50 वं अर्धशतक साजरं केलं आहे.  


शेवटी विलियमसन आणि केदार जाधवनं चांगली फटकेबाजी करत संघाला 171 धावांचा टप्पा गाठून दिला.