मॅन्चेस्टर : फुटबॉल जगतात ख्रिस्तियानो रोनाल्डो जो गोल करतो, तो स्टेडीयमवर उपस्थितांच्या नजरेचे पारणे फेडणारा होतो. चॅम्पियन्स लीगच्या सामन्यातही त्याच्या अशाच एका गोलची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. कारण, चॅम्पियन्स लीगमधील रीयल माद्रिद आणि जुवेंटस यांच्यातील सामन्यात ‘बायसिकल’ किकवरील गोलने स्टेडियमवर उपस्थित सर्वजणच अवाक झाले.


रियाल माद्रिदचे प्रशिक्षक जिनेदिन झिदान यांनी तर हा फुटबॉलच्या इतिहासातील महान गोल असल्याचे म्हटले आहे. रोनाल्डोच्या दमदार खेळाच्या जोरावर रीयल माद्रिदने जुवेंटसवर 3-0 असा दिमाखदार विजय मिळवला.

या सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला रोनाल्डोने पहिला गोल केला होता. त्यानंतर सामन्याच्या 64 व्या मिनिटाला रोनाल्डोने ‘बायसिकल’ किकवर नेत्रदीपक गोल करुन स्टेडीयमवर उपस्थितांची वाहवा मिळवली.

त्याचा हा गोल पाहून प्रतिस्पर्धी खेळाडूंनाही धक्का बसला. तर दुसरीकडे रोनाल्डोलाही या गोलनंतर आपला आनंद साजरा करण्याचा मोह आवरला नाही. विशेष म्हणजे, रियाल माद्रिदचे प्रशिक्षक जिनेदिन झिदान यांना रोनाल्डोचा गोल पचनी पडत नव्हता.

चॅम्पियन लीगमधील या सत्रात रोनाल्डोच्या नावावर 14 गोल नोंद झाले आहेत. तर 2018 मध्ये एकूण त्याने 23 गोल केले आहेत. त्याचबरोबर त्याने एका नव्या विक्रमालाही गवसणी घातली आहे. चॅम्पियन्स लीगमधील सलग सामन्यांमध्ये गोल करणारा रोनाल्डो हा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे.