शार्दूल टीम इंडियासह आफ्रिकेहून मायदेशी परतला. त्यानंतर त्याने विमानतळावरुन थेट अंधेरी स्टेशन गाठलं. तिथून त्याने पालघरसाठीचं लोकल रेल्वेचं तिकीट काढलं आणि चक्क रेल्वेने प्रवासही सुरु केला.
टीम इंडियाचा शिलेदार असलेल्या शार्दूलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे आणि टी ट्वेण्टी सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं. क्रिकेटमुळे ग्लॅमर प्राप्त झालेल्या खेळाडूंना आकाश ठेंगणं झाल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र कष्टाच्या जोरावर टीम इंडियात स्थान मिळवलेल्या मराठमोळ्या शार्दूलने आपला साधेपणा कायम ठेवत, लोकल रेल्वेने प्रवास केला.
शार्दूलसाठी लोकल प्रवास नवा नाही. पालघर ते मुंबई असा दीड तासांचा लोकल प्रवास तो दररोज करत होता. शार्दूल सरावासाठी मुंबईत लोकलनेच येत असे. कीट बॅग घेऊन, गर्दीतून प्रवास केल्याने मी क्रिकेटर म्हणून आणखी कणखर होत गेलो, असं शार्दूलने त्याच्या पहिल्या कसोटी निवडीवेळी सांगितलं होतं.
त्यामुळे आफ्रिकेवरुन परतल्यानंतर पुन्हा लोकलने प्रवास करण्यात विशेष काही वाटत नव्हतं असं शार्दूलने सांगितलं. नाही म्हणायला लोक उत्सुकतेने पाहात होते, मी शार्दूल ठाकूरच आहे का याची खात्री करुन घेत होते, माझे फोटो गुगलवर सर्च करत होते, असं शार्दूलने सांगितलं.