रवींद्र जाडेजाच्या ऑडीला अपघात, तरुणी जखमी
एबीपी माझा वेब टीम | 28 Jan 2017 02:50 PM (IST)
जामनगर : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा आणि त्याच्या पत्नीच्या कारला अपघात झाला. एका दुचाकीने त्यांच्या कारला धडक दिली. सुदैवाने अपघातात जाडेजा तसंच त्याच्या पत्नीला दुखापत झाली नाही. परंतु या घटनेत दुचाकीवरील तरुणी जखमी झाली. 'दैनिक भास्कर'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये हा अपघात झाला. जॉगर्स पार्क परिसरातील पार्क कॉलनी सोसायटीमधल्या घरातून जाडेजा पत्नी रीवासह ऑडी कारमधून बाहेर पडला. मात्र कॉलनीमधून बाहेर पडताच दुचाकीने जाडेजाच्या कारला मागून धडक दिली. यामुळे दुचाकीवरील तरुणी जखमी झाली. अपघातानंतर जाडेजा आणि त्याच्या पत्नीने जखमी मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तरुणीला किरकोळ जखमा झाल्याचं सांगण्यात आलं आहे. अपघातातील जखमी तरुणीचं नाव प्रिती शर्मा असून ती जामनगरच्या विद्यासागर इन्फोटेकमध्ये शिक्षण घेत आहे.