'जा रे जा रे पावसा, माझ्या महाराष्ट्रात जा, तुला माझ्या महाराष्ट्रात जायची गरज आहे, तिकडे जास्ती गरज आहे पावसाची, इकडे नाही' अशी दहा सेकंदांची क्लीप मराठमोळ्या केदारने इंग्लंडमधील नॉटिंगहॅममधल्या स्टेडियमवरुन पोस्ट केली आहे. केदारची आर्त हाक वरुणराजापर्यंत पोहचेल, तेव्हा पोहचेल, मात्र क्रीडा चाहत्यांपर्यंत हा व्हिडिओ वायरल होऊन पोहचला आहे.
इंग्लंडमध्ये कोसळणाऱ्या पावसामुळे विश्वचषकातील काही सामने रद्द करण्याची वेळ आली आहे. येत्या गुरुवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड, तर रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान असा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. अशा परिस्थितीत तणावात असलेल्या क्रिकेटपटूंनी सामन्यावरील पावसाचं सावट दूर व्हावं, यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत.
विश्वचषकातील पहिले दोन्ही सामने भारताने खिशात घालत शानदार सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिका आणि अवघड मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघालाही भारतीय संघाने धूळ चारली. पहिल्या दोन सामन्यांमध्ये केदारला फलंदाजीमध्ये आपली छाप सोडता आली नाही. गोलंदाजीमध्येही केदार चमकला नाही.