मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या आठवड्यापासूनच घरातल्या एका सदस्याने इतर सदस्यांसोबतच अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे. तो सदस्य म्हणजे साताऱ्याचे अभिजीत बिचुकले. इव्हेंच्युली, अॅक्सिडेंटली यासारख्या शब्दांची पेरणी करत आपल्या अनोख्या इंग्रजीने सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या बिचुकलेंना बिग बॉसने इंग्रजीची शिकवणी घेण्याचा टास्क सोपवला आहे.
सुरुवातीच्या आठवड्यात बिचुकलेंचं वागणं खटकल्यामुळे घरातल्या सगळ्याच सदस्यांनी त्यांना आपलं लक्ष्य केलं होतं. पण हळूहळू बिचुकलेंनी सगळ्यांच्या मनात आपली जागा निर्माण केली. त्यामुळे बिचुकलेंचा लळा अनेक सहस्पर्धकांना लागला. कधी रुपालीसोबत झालेलं भांडण असेल किंवा सिक्रेट स्ट्रॅटेजी असेल, बिचुकले कमालीचे प्रसिद्ध झाले आहेत. पण या सगळ्यात त्यांची आणखी एक गोष्ट सुपर डुपर हिट झाली आहे ते म्हणजे त्यांचं भन्नाट इंग्रजी.
बिग बॉसच्या घरात सध्या 'शाळा सुटली पाटी फुटली' हे साप्ताहिक कार्य सुरु आहे. आणि या साप्ताहिक कार्यात आता बिचुकले शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तेही साधेसुधे शिक्षक नाही बरं का. चक्क इंग्रजीचे शिक्षक. आता भन्नाट इंग्रजी असलेले आपले हे बिचुकले गुरुजी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवणार की विद्यार्थीच त्यांची शाळा घेणार हे भागात समजेल.
सतत वादात अडकूनही सलग दोन आठवडे उत्कृष्ट खेळाडू ठरलेला शेफ पराग कान्हेरे स्वयंपाकघर सोडून थेट शाळेच्या वर्गात गेला आहे, तेही शिक्षक म्हणून. पण यावेळी तो पाककौशल्याचे धडे द्यायचं सोडून विद्यार्थ्यांना प्रेमसाधना करायला शिकवणार आहे. सुरुवातीपासूनच रुपाली आणि त्याच्यात वाढत जाणारी मैत्री ही बिग बॉसच्या घरातला चर्चेचा विषय ठरली आहे. आमच्यात केवळ मैत्री आहे असा दावा करणाऱ्या या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे, अशी शंका दुसऱ्या गोटातल्या सदस्यांना आहे. त्यामुळेच एरवी स्वतःच्या पाककौशल्याचे गोडवे गाणारा पराग आज मात्र रुपाली साठी प्रेमगीत गाताना दिसणार आहे.
आधीच्या भागात किशोरी शहाणे यांच्या टीमने शिक्षकाची भूमिका बजावली. मुख्याध्यापिकेची भूमिका किशोरी शहाणेंकडे होती. त्यावेळी मराठी शिकवण्याची जबाबदारी शिव ठाकरेवर होती. नेहासोबत उडालेल्या खटक्यांमुळे त्याने तिला 'नापासा'चा शेरा दिला, तर रुपालीने गृहविज्ञानाच्या वर्गात बिचुकलेंना नापास केलं. त्यामुळे बिचुकले याचा वचपा काढणार का, हे सुद्धा उत्सुकतेचं ठरणार आहे.
गेल्या आठवड्यात 'वीकेंडचा डाव'मध्ये महेश मांजरेकरांनी बिचुकलेंना सुरेखा पुणेकरांशी इंग्रजीत संभाषण करायला लावलं होतं. त्यामुळे बिग बॉसही इंग्रजीवरुन त्यांची फिरकी घेणार हे साहजिक होतं.
अभिनेत्री मैथिली जावकर ही बिग बॉसच्या घरातून बाद झालेली पहिली स्पर्धक होती. आता चौदा स्पर्धक खेळात असून यंदा पराग, नेहा, दिगंबर, माधव, किशोरी आणि अभिजीत बिचुकले नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे या आठवड्यात कोण बाद होणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
'बिग बॉस'च्या शाळेत इव्हेंच्युअली बिचुकले गुरुजी देणार इंग्रजीचे धडे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jun 2019 07:14 PM (IST)
बिग बॉसच्या घरात 'शाळा सुटली पाटी फुटली' या साप्ताहिक कार्यात अभिजीत बिचुकले शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ते विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवणार की विद्यार्थीच त्यांची शाळा घेणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -