World Cup 2023, Yuzvendra Chahal : आगामी विश्वचषकात युजवेंद्र चहल भारतीय संघाचा भाग असेल की नाही? याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, त्रिनिदादमध्ये ब्रायन लारा स्टेडिअमवर सुरु असलेल्या अखेरच्या वनडे सामन्यात युजवेंद्र चहल याला बेंचवरच बसावे लागले आहे. वेस्ट इंडिजविरोधातील तिन्ही वनडे सामन्यात युजवेंद्र चहल याला संधी देण्यात आली नाही. क्रिकेट एक्सपर्टच्या मते, कुलदीप यादव भारतीय संघाची पहिल्या पसंतीचा फिरकी गोलंदाज बनला आहे. तर रविंद्र जडेजाला दुसरा फिरकी गोलंदाज असेल... अष्टपैलू असल्यामुळे रविंद्र जाडेजाचे स्थान निश्चित आहे. त्यामुळे युजवेंद्र चहलसाठी पुढचा रस्ता सोपा असणार नाही.
विश्वचषकात युजवेंद्र चहल भारतीय संघाचा भाग असेल की नाही?
भारतात होणाऱ्या आगामी विश्वचषकापूर्वी वेस्ट इंडिजचा दौरा महत्वाचा होता. पण चहल याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. विश्वचषकासाठी पहिली पसंती फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवला भारतीय संघ आजमावेल, असे मानले जात आहे. तर रविंद्र जडेजा अष्टपैलू म्हणून खेळणार आहे. अशा स्थितीत युजवेंद्र चहलला संधी मिळणार नाही, हे जवळपास निश्चित आहे. त्याचवेळी अक्षर पटेलकडे कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांचा बॅकअप म्हणून पाहिले जात आहे. म्हणजे कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा जखमी झाल्यास अक्षर पटेलला संधी मिळेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत प्लेइंग इलेव्हनचा भाग न झाल्याने युजवेंद्र चहलची विश्वचषकासाठी निवड होणार नाही, अशी अटकळ बांधली जात आहे.
तिन्ही सामन्यात चहल बेंचवरच -
वेस्ट इंडिजविरोधात झालेल्या तिन्ही एकदिवसीय सामन्यात चहल याला संधी मिळाली नाही. अखेरच्या सामन्यातही चहल याला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिले नाही. कुलदीप यादव तिन्ही सामन्यात खेळत आहे तर अक्षर पटेल याला एका सामन्यात संधी मिळाली. आजच्या सामन्यात भारतीय संघात दोन बदल करण्यात आले. उमरान मलिकच्या जागी जयदेव उनादकट याला स्थान दिलेय. तर अक्षर पटेल याच्या जागी ऋतुराज गायकवाड याला स्थान देण्यात आलेय. चहल याला तिन्ही सामन्यात बेंचवरच बसावे लागलेय.
पाच ऑक्टोबरपासून विश्वचषक -
यंदा होणारा एकदिवसीय विश्वचषक भारतामध्ये होणार आहे. पाच ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होत आहे. 2023 विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे होणार आहे.