मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू आणि सिक्सर किंग युवराज सिंहने पुन्हा क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब क्रिकेट संघ म्हणजेच पीसीएच्या विनंतीनंतर निवृत्ती घेतलेल्या युवराजने पुनरागमन करण्याचं ठरवंल. 2011 च्या विश्वचषकात मालिकावीर ठरलेल्या युवराजने मागील वर्षी जून महिन्यात क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली होती.
पीसीए सचिव पुनीत बाली हे पहले व्यक्ती होते, ज्यांनी 38 वर्षीय युवराजसमोर पंजाब क्रिकेटसाठी पुनरागमन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. युवराज सिंहने यासंदर्भात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांना पत्र लिहिल्याचंही पुनीत बाली यांनी सांगितलं.
प्रस्तावाकडे दुर्लक्ष करु शकलो नाही : युवराज सिंह
'क्रिकबझ'शी बोलताना युवराज म्हणाला की, "सुरुवातीला हा प्रस्ताव स्वीकारण्याबाबत मला खात्री नव्हती. मी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळणं बंद केलं होतं. मात्र जर मला बीसीसीआयकडून परवानगी मिळाली असती तर जगभरातील इतर प्रथम श्रेणी फ्रॅन्चायझी लीगमध्ये खेळणं मला सुरु ठेवायचं होतं. परंतु पुनीत बाली यांच्या प्रस्तावाकडे मला दुर्लक्ष करता आलं नाही. मी यावर फारच विचार केला, जवळपास तीन ते चार आठवडे. मला फार विचार करुन घेतलेल्या निर्णयाची गरज नव्हती हे अखेर माझ्या लक्षात आलं."
पंजाबचे युवा खेळाडून शुभमन गिल, अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंह आणि अनमोलप्रीत सिंह यांच्यासोबत मागील काही महिन्यात नेटमध्ये काम करताना, सराव करताना युवराजला या खेळाप्रती प्रेरणा आणि प्रेम पुन्हा जाणवू लागलं.
पंजाब क्रिकेटला युवराजची गरज : पुनीत बाली
यासंदर्भात पुनीत बाली म्हणाले की, "युवराज संघात असावा असं आम्हाला वाटतं. तो ज्या प्रकारे युवा खेळाडूंना मार्गदर्शन करतो, ते अप्रतिम आहे. तुझ्या आयुष्यातील कमीत कमी आणखी एक वर्ष पंजाब क्रिकेटला द्यावं, असं मी युवराजला म्हटलं. पंजाब क्रिकेटला त्याची गरज आहे. खेळाडू आणि मेंटर म्हणून इतरांना देण्यासाठी त्याच्याकडे खूप काही आहे. दोन आठवड्यांपूर्वी त्याने बीसीसीआय अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. याचं उत्तर आतापर्यंत आलं असेल."
आई-वडिलांची प्रतिक्रिया
युवराजची आई शबनम सिंह म्हणाल्या की, "युवराजमध्ये खेळाप्रती जिद्द अजून कायम आहे. दोन दिवसांत तो दुबईहून परत येत आहे आणि त्यानंतर आम्ही दीर्घ चर्चा करु. तुम्ही जे ऐकत आहात ते खरंच असेल."
"20 वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर तो मागील वर्षी निवृत्त झाला. तो त्याचा वैयक्तिक निर्णय होता, ज्यात मी हस्तक्षेप केला नाही. पण त्याने निवृत्ती घेऊ नये असं मला तेव्हाही वाटलं होतं. तो कायमच देत असता. सध्याच्या प्रखर उन्हातही तो शुभमन, प्रभ आणि अभिषेक यांच्याकडून दररोज पाच तास सराव करुन घेतो," असं युवराजचे वडील योगराज सिंह म्हणाले की,
युवराजला बिग बॅश लीगमध्ये खेळण्याची इच्छा असून क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्याच्यासाठी संघ शोधण्याचा प्रयत्न करत आहे, असं वृत्त मंगळवारी (8 सप्टेंबर) आलं होलं. बीसीसीआयच्या नियमांनुसार केवळ निवृत्ती घेतलेले खेळाडूच परदेशातील क्रिकेट लीगमध्ये खेळू शकतात.