मुंबई : सिक्सर किंग आणि 2011 च्या क्रिकेट विश्वचषकाचा नायक युवराज सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. मुंबईतील एका हॉटेलमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत युवराज सिंहने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून आज निवृत्तीची घोषणा केली. 19 वर्षांची कारकीर्द आज संपुष्टात आली, हे सांगताना युवराज भावुक झाला होता. यावेळी त्याने आपल्या चाहत्यांचे आभारही मानले.
"प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असा क्षण येतो की, आता थांबवं. आई-वडिलांशी चर्चा करुनच निवृत्तीचा निर्णय वर्षभरापूर्वी घेतला होता," असं युवराजने यावेळी सांगितलं. निवृत्तीनंतर कॅन्सरग्रस्तांसाठीचं काम सुरुच ठेवणार असल्याचं युवराज म्हणाला.
निवृत्तीनंतर काय करणार यावर युवराज म्हणाला की, "माझ्या आयुष्यातील मोठा काळ क्रिकेटला दिल्यानंतर आता मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता मी कॅन्सर रुग्णांसाठी काम आहे." आपल्या You We Can या फाऊंडेशन अंतर्गत देशभरातील कॅन्सर पीडितांसाठी कॅम्प आयोजित करणार, आजारी लोकांची मदत करणार असल्याचं युवराने सांगितलं.
कॅन्सरवर मात
युवराजने स्वत: कॅन्सरविरुद्धची लढाई जिंकत कमबॅक केलं आहे. 2011 च्या विश्वषकानंतर त्याला कॅन्सर असल्याचं समोर आलं. यानंतर त्याने सुमारे दोन वर्ष कॅन्सरशी दोन हात केले आणि संघात पुनरागमन केलं. कॅन्सरमुक्त झाल्यानंतर युवराज सिंहने आपल्या You We Can नावाच्या फाऊंडेशनची सुरुवात केली होती, ज्याअंतर्गत तो कॅन्सर पीडितांना मदद करतो.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 8701 धावा
युवराज सिंहने 3 ऑक्टोबर 2000 मध्ये केनियाविरोधात नैरोबीमध्ये वनडे क्रिकेटद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. युवराजने 308 एकदिवसीय सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. वनडेमध्ये युवराज सिंहने 36.55 च्या सरासरीने 8701 धावा केल्या आहेत. यामध्ये 52 अर्धशतकं आणि 14 शतकांचा समावेश आहे. वनडे फॉरमॅटमध्ये युवराज सिंहचा सर्वाधिक धावसंख्या 150 धावा आहेत.
कसोटीमध्ये 40 सामने
वनडे शिवाय युवी कसोटी फॉरमॅटमध्ये 40 सामना खेळला आहे. कसोटीमध्ये युवराजने 33.92 च्या सरासरीने 1900 धावा केल्या आहे. त्याने तीन शतकं आणि 11 अर्धशतक करण्याचा पराक्रम केला आहे.
ट्वेण्टी-20 स्पेशालिस्ट
तर ट्वेण्टी-20 क्रिकेटचा स्पेशालिस्ट समजला जाणारा युवराज भारतीय संघासाठी 58 वेळा मैदानात उतरला आहे. टी-20 मध्ये युवराज सिंहने 1177 धावा बनवल्या आहेत, ज्यात आठ वेळा 50 किंवा यापेक्षा जास्त धावांची खेळी रचली आहे.
सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराज सिंह हा जगातील एकमेव खेळाडू आहे, ज्याच्या नावावर सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम आहे. युवराज सिंहने साल 2007 च्या टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध केवळ 12 चेंडूंमध्ये 50 धावा करण्याचा कारनामा केला होता.
'सिक्सर किंग' युवराज
युवराजने याच सामन्यात इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 6 चेंडूंवर सलग सहा षटकार लगावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. यामुळे युवराजला 'सिक्सर किंग' ही नवी ओळख मिळाली.
गोलंदाजीतही कमाल
युवराज सिंहने भारतीय संघासाठी केवळ फलंदाजीच नाही तर गोलंदाजीत कमाल केली आहे. युवराजने भारतासाठी वनडेमध्ये 111 विकेट्स घेतल्या आहेत. वनडेमध्ये युवराजची सर्वोत्तम कामगिरी होती 31 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स. वनडेशिवाय कसोटी क्रिकेटमध्ये युवराजने 9 आणि टी-20 मध्ये 28 विकेट्स घेतल्या आहेत.
प्रथम श्रेणीतही दमदार कामगिरी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही युवराजची कामगिरी दमदार होती. पंजाबसाठी युवराजने 139 प्रथम श्रेणी, 423 लिस्ट ए आणि 231 टी-20 सामन्यात प्रतिनिधित्त्व केलं आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये युवराज सिंहने 8965 धावा केल्या आहे, ज्यात 36 अर्धशतकं आणि 26 शतकांचा समावेश आहे.
तर लिस्ट ए मध्ये युवराज सिंहने 37.91 च्या सरासरीने 12663 धावा केल्या आहेत. लिस्ट ए मध्ये युवराज सिंहच्या नावावर 78 अर्धशतकं आणि 19 शतकांची नोंद आहे.
याशिवाय टी-20 मध्ये युवराजने 4857 धावा केल्या आहेत.
पुनरागमनाचा अयशस्वी प्रयत्न
युवराज यावर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. परंतु त्याला बऱ्याच सामन्यात संधी मिळाली नव्हती. भारतीय संघात त्याने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. तर टेस्ट क्रिकेटमध्ये तर युवराजचं 2012 नंतर टीममध्ये कमबॅकच झालेलं नाही. 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमधील वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना त्याचा अखेरचा ठरला.
युवराज सिंहचा क्रिकेटला अलविदा, सिक्सर किंगच्या निवृत्तीने चाहते भावुक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jun 2019 09:53 PM (IST)
युवराज सिंहने 3 ऑक्टोबर 2000 मध्ये केनियाविरोधात नैरोबीमध्ये वनडे क्रिकेटद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -