Irani Cup 2025 Yash Dhull Yash Thakur Clash : इराणी कप 2025 च्या शेवटच्या दिवशी मैदानावर चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला. विदर्भचा वेगवान गोलंदाज यश ठाकुर आणि रेस्ट ऑफ इंडिया संघाचा फलंदाज यश धुल हे भर मैदानात भिडले. नागपूरमध्ये झालेल्या या सामन्यात रणजी विजेता विदर्भने रेस्ट ऑफ इंडियावर 93 धावांनी मात करत विजेतेपद पटकावले.

Continues below advertisement


रविवारी इराणी कपचा शेवटचा दिवस होता. दोन्ही संघांमध्ये विजयासाठी चुरशीचा सामना चालू होता. रेस्ट ऑफ इंडियासमोर 361 धावांचे आव्हान होते. मात्र त्यांनी सुरुवातीलाच विकेट्स गमावल्या आणि विदर्भने सामन्यावर पकड मजबूत केली. त्यानंतर दिल्लीचा फलंदाज यश धुलने मानव सुधारसोबत शतकी भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढले आणि विजयाची आशा जिवंत ठेवली.


इराणी कपमध्ये दोन भारतीय खेळाडू भिडले


यश धुल चांगल्या फॉर्मात फलंदाजी करत होता, त्यामुळे विदर्भचे गोलंदाज दबावाखाली आले होते. धुल 116 चेंडूंवर 92 धावा करून खेळत असतानाच, 63व्या षटकातील पहिल्या चेंडूवर यश ठाकुरने एक शॉर्ट बॉल टाकला. धुलने पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला पण ते झेलबाद झाला. विकेट मिळाल्यानंतर ठाकुरने उत्साहात जरा जास्तच सेलिब्रेशन केलं.






या सेलिब्रेशनरम्यान यश ठाकुर धुलला काहीतरी म्हटला, त्यावर धुलही भडकला. दोघे एकमेकांकडे धावले आणि क्षणभर वाटले की मारामारी होईल. अंपायरला मध्ये पडून भांडण थांबवावे लागले आणि ठाकुरला दूर नेण्यात आले. मैदानावरचा हा ‘हाय व्होल्टेज’ प्रसंग पाहून प्रेक्षकांना विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या जुनी भांडणाची आठवण झाली.


चाहत्यांना झाली कोहली–गंभीर वादाची आठवण


हे पहिल्यांदाच नाही की दोन भारतीय खेळाडू आपापल्या संघासाठी खेळताना भिडले आहेत. आयपीएल 2013 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर आणि आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली यांच्या दरम्यान मैदानावर तणाव निर्माण झाला होता. कोहली बाद झाल्यानंतर गंभीरने काहीतरी म्हटल्याने कोहली त्याच्याकडे संतापाने धावून गेला होता. दोघे जवळजवळ भिडणार इतक्यात केकेआरचा वरिष्ठ खेळाडू रजत भाटिया मध्ये पडून विषय शांत केला होता. 


विदर्भाने तिसऱ्यांदा जिंकले इराणी कप विजेतेपद 


या सामन्यात विदर्भाने दुसऱ्या डावात शेष भारताला 267 धावांवर गुंडाळले आणि 93 धावांनी विजय मिळवला. यासह विदर्भाने तिसऱ्यांदा इराणी कप विजेतेपद जिंकले. या सामन्यात यश ठाकूरच्या गोलंदाजी कामगिरीत एकूण सहा विकेट्सचा समावेश होता, ज्यामध्ये पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात दोन विकेट्सचा समावेश होता.