ICC World Test Championship : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला 8 विकेट्सने लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. भारताने न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचे लक्ष्य दिले, ज्याचा त्यांनी सहज पाठलाग केला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो चुकीचा ठरला. भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या 46 धावांत सर्वबाद झाला होता. आता या पराभवामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. 


खरंतर, बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पराभवामुळे संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या सामन्यापूर्वी संघ 74.24 च्या विजयाच्या टक्केवारीसह अव्वल होता, परंतु आता संघाची विजयाची टक्केवारी 68.06 वर आली आहे. मात्र, त्यानंतरही तो गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. या यादीत ऑस्ट्रेलिया 62.50 विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे.






न्यूझीलंडचा मोठा फायदा 


बंगळुरूमध्ये भारताचा पराभव करून न्यूझीलंडला मोठा फायदा झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये तो थेट चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, इंग्लंड संघ आता पाचव्या स्थानावर घसरला आहे, जो आधी चौथ्या स्थानावर होता. भारत आणि ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंका संघ यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याची विजयाची टक्केवारी 55.56 आहे.


तसं पाहिलं तर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा अव्वल दोन संघांमध्ये समावेश झाल्यानंतरही अंतिम फेरीतील दोन संघ अद्याप निश्चित झालेले नाहीत. संघांमधील लढती जसजशी वाढत आहेत, तसतशी अंतिम फेरीची शर्यत अधिक रोमांचक होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाशिवाय श्रीलंका, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे संघही अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी दावेदार आहेत.


सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पहिल्या डावात 46 धावांत ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात 402 धावा केल्या. त्याचवेळी टीम इंडियाने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन करत 462 धावा केल्या. अशा स्थितीत टीम इंडियाने या सामन्यात न्यूझीलंडसमोर विजयासाठी 107 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. न्यूझीलंडने हे लक्ष्य अवघ्या 2 गडी गमावून पूर्ण केले आणि 36 वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकला.


हे ही वाचा -


Ind vs Nz Test Series : काळजावर दगड ठेऊन रोहित घेणार मोठा निर्णय, पुणे कसोटीतून मित्राला दाखवणार बाहेरचा रस्ता