WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपमध्ये (ICC World Test Championship Finals) पहिला कल भारताच्या (Team India) बाजूने लागला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनल मॅचमध्ये रोहित शर्माने टॉस (Toss) जिंकला. भारताने पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. ईशान किशन की के एस भरत हा प्रश्न आता सुटला आहे. प्लेईंग इलेव्हनमध्ये भरतला संधी देण्यात आली असून, विकेटकिपिंगची धुरा त्याच्याकडे असेल. महत्त्वाचं म्हणजे भारताने प्लेईंग इलेव्हनमध्ये एकही फुलटाईम फिरकीपटूला स्थान दिलेलं नाही. दुसरीकडे चार वेगवान गोलंदाज मैदानात आहेत.


तत्पूर्वी हा निर्णय योग्य ठरवत मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. सिराजने ऑस्ट्रेलियाला सलामीवीर उस्मान ख्वाजाला माघारी पाठवलं. त्याला खातंही उघडता आलं नाही.


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपकडे जगाचं लक्ष


दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपकडे भारतासह जगाचं लक्ष लागलं आहे. WTC च्या फायनलमध्ये (ICC World Test Championship Finals) टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) हे समोरासमोर आहेत. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. 


भारताकडे विराट कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे असे आघाडीचे फलंदाज आहेत. तर शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी अशी आक्रमक गोलंदाजांची फौज टीम इंडियाकडे आहे. 


तिकडे ऑस्ट्रेलियन संघही तितक्याच तयारीचा आहे. डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नश लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, कॅमरुन ग्रीन, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स अशी फलंदाजांची मोठी फळी त्यांच्याकडे आहे.


टीम इंडिया 10 वर्षांचा दुष्काळ संपवणार?


दरम्यान गेल्या 10 वर्षांपासून टीम इंडियाने आयसीसीची एकही स्पर्धा जिंकलेली नाही. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2013 चॅम्पियन ट्रॉफीवर कब्जा केला होता. तेव्हापासून भारतीय संघ आयसीसी स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला होता. अशा परिस्थितीत आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 10 वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे.


भारतीय संघ : रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के एस भरत, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराज असा संघ मैदानात उतरला आहे.


ऑस्ट्रेलियन संघ : डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नश लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, कॅमरुन ग्रीन, अॅलेक्स कैरी, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलेंड.