WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पकड मजबूत केली आहे. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 270 धावांवर घोषित केलाय. पहिल्या डावातील 173 धावांच्या आघाडीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 444 धावांचे आव्हान दिलेय. भारतीय संघाला 137 षटकात हे आव्हान पार करायचे आहे.  दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून अॅलेक्स कॅरी याने सर्वाधिक 66 धावांचे योगदान दिलेय. टीम इंडियाकडून रविंद्र जाडेजा याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.


चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर उमेश यादव याने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का. मार्नस लाबुशेन याला त्याने तंबूत धाडले. लाबूशन याने 41 धावांचे योगदान दिले. लाबुशेन बाद झाल्यानंतर कॅमरुन ग्रीन आणि अॅलेक्स कॅरी यांनी डाव सावरला. दोघांनी दमदार फलंदाजी केली. रविंद्र जाडेजाने ग्रीन याला तंबूत पाठवत भारताला मोठे यश मिळून दिले. पण त्यानंतर कॅरी आणि स्टार्क यांनी भारताची डोकेदुखी वाढवली. कॅरी याने अर्धशतकी खेळी केली. मिचेल स्टार्क 41 धावांवर शमीचा शिकार ठरला. पट कमिन्स पाच धावांवर बाद झाला. कर्णधार कमिन्स याने ऑस्ट्रेलियाचा डाव घोषित केला. 


ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा कॅरी याने चोपल्या. अॅलेक्स कॅरी याने 66 धावांची खेळी केली. मिचेल स्टार्क याने 41 धावांचे योगदान दिले. त्याशिवाय स्मिथ 34, लाबुशेन 41 यांनीही महत्वाचे योगदान दिले. भारताकडून रविंद्र जाडेजा याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. शमी आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. सिराजला एक बळी मिळाला.



तिसऱ्या दिवशी काय झाले ?


जागतिक कसोटी विजेतेपदाच्या फायनलवर ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या दिवशी आपली पकड घट्ट केली आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलिया तिसऱ्या दिवसअखेर 4 बाद 123 धावांची मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 173 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळं लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी 296 धावांची झाली आहे. रविंद्र जाडेजा याने दोन तर उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मार्नस लाबुशेन 41 तर कॅमरुन ग्रीन 7 धावांवर खेळत होते. त्याआधी या कसोटीत टीम इंडियानं पहिल्या डावात सर्व बाद 296 धावांची मजल मारली. अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर या मुंबईकरांनी झुंजार फलंदाजी करून टीम इंडियाची लाज राखली. त्या दोघांनी सातव्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी रचून भारतीय संघाला फॉलोऑनपासून वाचवलं. अजिंक्य रहाणेनं 129 चेंडूंत 11 चौकार आणि एका षटकारासह 89 धावांची, तर शार्दूल ठाकूरनं 109 चेंडूंत सहा चौकारांसह 51 धावांची खेळी उभारली.