WPL 2023, UPW-W vs GG-W :  महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेतील आजच्या दिवसातील दुसरा सामना यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स (GG vs UPW) या संघामध्ये होणार आहे. पहिल्या सामन्यात 143 धावांनी पराभव पत्करल्यानंतर लगेचच 24 तासांमध्ये गुजरातचा संघ पुन्हा एकदा मैदानात उतरत आहे. या सामन्यात गुजरात जायंट्ससाठी मोठी समस्या अशी आहे की कर्णधार बेथ मुनी पहिल्या सामन्यात दुखापत झाल्यानंतर आज विश्रांतीवर आहे. अशा परिस्थितीत स्नेह राणा या सामन्यात संघाचं नेतृत्व करताना दिसू शकते. त्याच वेळी, मूनीच्या जागी, संघाकडे सोफी डंकलेचा पर्याय आहे, ती फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत कमाल करु शकते.  दुसरीकडे, यूपी वॉरियर्स संघाबद्दल बोलायचं तर, ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची अनुभवी खेळाडू अॅलिसा हिली त्यांचे कर्णधारपद सांभाळताना दिसणार आहे. याशिवाय दीप्ती शर्मा, ताहलिया मॅकग्रा असे दमदार खेळाडू त्यांच्याकडे आहेत.


पिच रिपोर्ट काय म्हणतोय?


हा सामना नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाईल. जिथे फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये सारखी लढाई दिसून येते. या खेळपट्टीवर, जिथे चेंडू थेट बॅटवर येतो त्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला थोडा अधिक फायदा मिळू शकतो.


कशी आहे दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन?


यूपी वॉरियर्सचा संघ : एलिसा हिली (कर्णधार आणि विकेटकीपर), किरण नवगिरे, श्वेता सेहरावत, दीप्ती शर्मा, ताहलिया मॅकग्रा, सोफी एक्लेस्टोन, ग्रेस हॅरिस, लॉरेन बेल, राजेश्वरी गायकवाड, देविका वैद्य, शबनीम इस्माईल.


गुजरात जायंट्सचा संघ : सोफी डंकले, सबिनेनी मेघना, हरलीन देओल, अॅशले गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, डायलन हेमलता, जॉर्जिया वेरेहेम, स्नेह राणा (कर्णधार), तनुजा कंवर, मोनिका पटेल, मानसी जोशी.





सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?


यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स या महिला संघात खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.


WPL 2023 मध्ये कोणते संघ सहभाग घेत आहेत?


मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स हे संघ स्पर्धेत सहभागी होत असून सर्व सामने मुंबईच्या दोन स्टेडियममध्ये खेळवले जातील. डीवाय पाटील स्टेडियमवर 11 सामने आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर 11 सामने होणार आहेत.


हे देखील वाचा-