Women’s Premier League 2023 : मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात सुरु महिला प्रीमियर लीग (WPL) च्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB vs DC) सामन्यात दिल्ली संघाने स्फोटक फलंदाजीचं दर्शन घडवत तब्बल 223 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. विशेष म्हणजे यावेळी दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग आणि सलामीवीर शेफाली यांनी दीडशेहून अधिक धावांची तगडी भागिदारी केली, ज्यामुळे इतकी मोठी धावसंख्या दिल्लीने उभारली आहे. यामध्ये शेफालीने सर्वाधिक 84 तर मेगने 72 धावा केल्या आहेत. जेमिमाने नाबाद 22 आणि मारिजन कॅपने नाबाद 39 धावांची छोटी पण दमदार खेळी यावेळी केली आहे. या भागीदारीत मेगने 167.44 च्या स्ट्राईक रेटने 43 चेंडूत 72 धावा केल्या, तर भारताची सलामीवीर शफाली वर्माने 186.67 च्या स्ट्राईक रेटने 45 चेंडूत 84 धावा केल्या, ज्यात तिने 10 चौकार आणि 4 षटकारही ठोकले. शेफाली आपल्या पहिल्याच सामन्यात शतकाच्या दिशेने वाटचाल करत होती, पण आरसीबीच्या हीदर नाइटने तिला स्टंप आऊट केले आणि 84 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.


दिल्ली कॅपिटल्सच्या या दोन्ही खेळाडूंनी महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPL च्या इतिहासात पहिल्या विकेटसाठी किंवा कोणत्याही विकेटसाठी 100 आणि 150 धावांची पहिली भागीदारी करण्याचा विक्रमही केला आहे. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सने पहिल्याच सामन्यात दाखवून दिले आहे की त्यांच्याकडे फलंदाजीत किती ताकद आहे. दिल्लीची पहिली विकेट मॅग लॅनिंगच्या रूपाने 162 धावांवर पडली आणि दुसरी विकेट शेफाली वर्माच्या रूपाने 163 धावांवर पडली. मात्र, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची खेळाडू मारिजन कॅप आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी दिल्लीच्या धावसंख्येचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करण्याचे काम केले. सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकून बंगळुरुची कर्णधार स्मृती मानधनाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निरणय घेतला. दिल्लीला कमी धावांत रोखून निर्धारीत लक्ष्य पूर्ण करण्याचा त्यांचा डाव आहे. पण दिल्लीच्या धमाकेदार फलंदाजीमुळे एक अत्यंत मोठं लक्ष्य आता आऱसीबी संघाला मिळालं आहे. पण आरसीबी संघातही स्टार खेळाडूंचा भरणा असल्याने एक चुरशीची लढत नक्कीच पाहायला मिळू शकते.






कसे आहेत दोन्ही संघ?


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ - स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, हीदर नाइट, दिशा कासट, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, आशा शोबाना, प्रीती बोस, मेगन शुट, रेणुका ठाकूर सिंग.


दिल्ली कॅपिटल्सचा संघ- शेफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), मारिझान कॅप, जेमिमाह रॉड्रिग्स, अॅलिस कॅप्सी, जेस जोनासेन, तानिया भाटिया (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव, तारा नॉरिस


हे देखील वाचा-


WPL 2023 Schedule : महिला प्रीमियर लीग 2023 चं वेळापत्रक ते लाईव्ह स्ट्रीमिंग, A टू Z माहिती एका क्लिकवर