WPL 2023 : ऑस्ट्रेलियाची रन-मशीन आणि नुकत्याच झालेल्या वर्ल्डकपमध्ये (Womens T20 World Cup) ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकवण्यात मोठी कामगिरी करणाऱ्या बेथ मुनी (Beth moony) हिला महिला प्रीमियर लीग (WPL 2023) मध्ये गुजरात संघाने कर्णधार म्हणून घोषित केलं आहे. महिला आयपीएल 2023 स्पर्धा 4 मार्चपासून सुरु होणार आहे. याआधी गुजरात जायंट्सने ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक फलंदाज बेथ मुनीला पहिल्या सत्रासाठी संघाची कर्णधार बनवून मोठी जबाबदारी सोपवली आहे. गुजरात जायंट्सचा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध 4 मार्च रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. मुनी दीर्घकाळापासून ऑस्ट्रेलिया महिला संघाचा भाग आहे.


विश्वचषक फायनलमध्ये केली शानदार खेळी


नुकत्याच झालेल्या महिला T20 वर्ल्ड फायनल मॅचमध्ये बेथ मुनीने टीमसाठी शानदार खेळी खेळली. तिने 53 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 74 धावा केल्या. यादरम्यान तिचा स्ट्राईक रेट 139.62 होता. तिच्या खेळीने ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. फायनलमध्ये मुनी संघासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होता.


बेथची कारकीर्द थोडक्यात


बेथ मुनी ही डावखुरी फलंदाज आहे. ती विकेटकीपिंगचीही भूमिका बजावू शकते. 29 वर्षीय बेथ मूनी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खूप धावा करताना याआधी दिसून आली आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, जिथे तिची फलंदाजीची सरासरी 40 हून अधिक आहे, एकदिवसीय क्रिकेटमध्ये, ती 52.45 च्या उत्कृष्ट सरासरीने धावा करत आहे. बेथ मुनीने जानेवारी 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत तिने टी-20 फॉरमॅटमध्ये 83 सामने खेळले आहेत. ज्यात तिने 77 डावांमध्ये 40.51 च्या सरासरीने 2350 धावा केल्या आहेत. यादरम्यान तिचा स्ट्राईक रेटही 125+ राहिला आहे. तिने T20 फॉरमॅटमध्ये दोन शतकं आणि 18 अर्धशतकं झळकावली आहेत. एकूणच, गुजरात जायंट्सला T20 क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक फलंदाज मिळाली आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील बेथचा रेकॉर्ड आणखी मजबूत झाला आहे. 57 एकदिवसीय सामन्यांच्या 52 डावांमध्ये बेथने 52.45 च्या सरासरीने 1941 धावा केल्या. येथे तिचा स्ट्राईक रेट 87.66 आहे. तिने वनडे फॉरमॅटमध्येही तीन शतकं झळकावली आहेत.


महिला प्रीमियर लीग 2023 साठी गुजरात जायंट्स संघ


सोफिया डंकले, सब्बिनेनी मेघना, बेथ मुनी, सुषमा वर्मा, अॅशले गार्डनर, हरलीन देओल, डायंड्रा डॉटिन, अॅनाबेल सदरलँड, स्नेह राणा, जॉर्जिया वॅरेहम, मानसी जोशी, दयालन हेमलता, तनुजा कंवर, हर्ले गाला, अश्विनी कुमार, मोनिका पटेल, सिनिका पटेल, शबनम शकील.


हे देखील वाचा-