मुंबई : ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे, तर भारत दुसर्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचे सरासरी 82.22 टक्के, तर भारताचे 75 टक्के गुण आहेत. न्यूझीलंड पॉईंट टेबलवर 62.5 टक्क्यांसह तिसर्या क्रमांकावर आहे.
याआधीच्या पॉईंट टेबलमध्ये भारत अव्वल स्थानावर होता, पण त्यादरम्यान आयसीसीने नियम बदलले. ज्यामुळे भारतीय संघ दुसर्या क्रमांकावर आला आणि ऑस्ट्रेलियन संघ पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला. पॉईंट टेबलमधील बदलावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही काही प्रश्न उपस्थित केले आहे.
विराट कोहली म्हणतो...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्याआधी विराट कोहली म्हणाला, की “निश्चितच हा एक आश्चर्यकारक निर्णय आहे. आम्हाला सांगितले होते, की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टॉपचे दोन संघ गुणांच्या आधारे पात्र ठरतील. पण अचानक आता टक्केवारीच्या आधारे क्रमवारीत बदल करण्यात आला आहे." तसेच असा निर्णय का घेण्यात आला हे देखील समजणे कठीण आहे.
पॉईंट्सच्या आधारे भारत अव्वल
भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील आयसीसी क्रिकेट समितीने हा बदल केला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणार्या संघांचा निर्णय गुणांच्या टक्केवारीच्या जोरावर घेण्यात येईल. भारताकडे सध्या 360 पॉईंट्स असून ऑस्ट्रेलियाकडे 296 पॉईंट्स आहेत. भारत 64 पॉईंट्सने ऑस्ट्रेलियाच्या पुढे आहे. परंतु टक्केवारीच्या आधारे भारत दुसर्या क्रमांकावर आहे.