Virat Kohli vs Sachin Tendulkar Comparison : सचिन तेंडुलकरच्या विक्रमांची बरोबरी करणे कोणत्याही खेळाडूला अशक्य आहे, पण अनेक वेळा सध्या खेळणाऱ्या खेळाडूंची तुलना क्रिकेटच्या देवासोबत केली जाते. यामध्ये सर्वात मोठं नाव म्हणजे, विराट कोहलीचं होय. स्वत: सचिन तेंडुलकरनेही माझा विक्रम विराट कोहली अथवा रोहित शर्मा मोडतील, असं वक्तव्य केले होते. विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा आणि शतकांचा पाऊस पडल्यानंतर अनेकांनी त्याची तुलना सचिन तेंडुलकरसोबत केली आहे. पण या दोन दिग्गजांची तुलना करणं कठीण आहे, कारण दोन्ही खेळाडू वेगवेगळ्या युगात राहत होते आणि दोघांच्या काळात क्रिकेटचा खेळ सारखा नव्हता. पण ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज उस्मान ख्वाजा याने विराट कोहली हा सचिन तेंडुलकरपेक्षा उजवा असल्याचे म्हटलेय. त्याने याचे कारणही सांगितलेय.
विराट कोहली सचिनपेक्षा उजवा -
फॉक्स क्रिकेटसोबत बोलताना उस्मान ख्वाजा याने विराट कोहली सचिनपेक्षा उजवा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. उस्मान ख्वाजा म्हणाला की, वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहली सचिन तेंडुलकरपेक्षा नक्कीच उजवा आहे. जर तुम्ही दोन्ही खेळाडूंचे आकडे पाहिले तर तुम्हाला हे लक्षात येईल. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावावर वनडेमध्ये जवळपास सारखीच शतके आहेत. पण सचिनच्या तुलनेत विराट कोहलीने कमी सामने खेळले आहे. मी जेव्हा मोठा झालो तेव्हा सचिन तेंडुलकर अनेकांसाठी बेंचमार्क होता, पण विराट कोहली जे करतो आहे ते कोणीही केले नाही.
सचिन आणि विराट यांचे वनडेतील कामगिरी -
सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची वनडे क्रिकेटमध्ये नेहमीच तुलना होते. दोघांच्या सामन्याची आणि शतकांची तुलनाही केली जाते. विराट कोहलीने भारतासाठी आतापर्यंत 284 सामन्यातील 272 डावात फलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने 13239 धावांचा पाऊस पाडला होती. विराट कोहलीने 47 शतके आणि 68 अर्धशतके ठोकली आहेत. विराट कोहलीची सर्वोत्तम धावसंख्या 183 इतकी आहे. तर सचिन तेंडुलकर याने 463 सामन्यातील 452 डावात 18426 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 49 शतके आणि 96 अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या 200 इतकी आहे. विराट कोहली भारतासाठी चौथा विश्वचषक खेळत आहे. 2011 ते 2023 यादरम्यान तो विश्वचषकात खेळत आहे. सचिन तेंडुलकर याने सहा विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. 1992 ते 2011 यादरम्यान सचिन भारतीय संघाचा सदस्य होता.