World Cup 2023, ENG vs AFG : रविवारी अफगाणिस्तान संघाने यंदाच्या विश्वचषकात मोठा उलटफेर केला. अफगाणिस्तान संगाने गतविजेत्या इंग्लंड संघाला पराभवाचा धक्का दिला आहे. अफगाणिस्तान संघाने साहेबांचा पराभव करत गुणतालिकेत मोठा फेरबदल केला आहे. पाच वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया दहाव्या क्रमांकावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाला दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्यांचा रनरेटही खालावला आहे. अफगाणिस्तान संघ याआधी दहाव्या क्रमांकावर होता, तर ऑस्ट्रेलियाचा संघ नवव्या स्थानावर विराजमान होता, पण साहेबांचा पराभव करत अफगाण संघाने ऑस्ट्रेलियाला दहाव्या क्रमांकावर ढकलले आहे.
सामन्यात काय झालं ?
विश्वविजेत्या इंग्लंडने स्वप्नातही कल्पना केली नसेल अशी दमदार कामगिरी रविवारी अफगाणिस्ताने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर केली. 285 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या विश्वविजेत्या इंग्लंडला 210 धावांमध्ये गुंडाळत 69 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विश्वचषकाच्या 15 व्या सामन्यात अफगाणिस्तानने वर्ल्डकपमध्ये पहिल्या विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानची फिरकी त्रिमूर्ती असलेल्या मुजीबूर रहमान (3 विकेट), रशीद खान (3 विकेट) आणि मोहम्मद नबी (2 विकेट) यांनी आठ विकेट घेत इंग्लंडला पार नेस्तनाबूत झाला. फारुकी आणि नावीन हकने प्रत्येकी एक विकेट घेतली. पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तानने इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडतना 284 धावा कुटल्या. इंग्लंडने या सामन्यामध्ये तब्बल सात गोलंदाजांचा वापर केला, तरीही अफगाणिस्तानला रोखण्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना यश आलं नाही. अफगाणिस्तानचा डाव शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर संपला. त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजांना फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.
गुणतालिकेत भारत कोणत्या क्रमांकावर ?
पाकिस्तानचा पराभव करत शनिवारी भारताने गुणतालिकेत अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. भारतायी संघाचे तीन सामन्यात सहा गुण झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या न्यूझीलंडचेही सहा गुण आहेत. पण भारताचा रनरेट चांगला आहे, त्यामुळे भारत टॉपवर आहे. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांचे समान गुण आहेत. पण दक्षिण आफ्रिकेचा रनरेट सरस असल्यामुळे चार गुणांसह ते तिसऱ्या स्थानावर विराजमान आहेत. तर पाकिस्तानचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान संघाला तीन सामन्यात दोन विजय आणि एका पराभवाचा सामना करावा लागला.
साहेबांचा पराभव करत अफगाणिस्तान संघाने दहाव्या क्रमांकावरुन थेट सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ नवव्या स्थानावरुन दहाव्या स्थानी घसरला आहे. इंग्लंडचा संघ तीन सामन्यात दोन पराभवासह गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे.