T20 World Cup 2024 : टी 20 विश्वचषकाला बोटावर मोजण्याइतकेच दिवस शिल्लक राहिलेत. वॉर्मअप सामन्याला सुरुवातही झाली आहे. यंदाच्या टी20 विश्वचषकात 20 संघ सहभागी झाले असून स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होत आहे. दोन जूनपासून विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरुवात होत आहे. विश्वचषकासाठी टीम इंडिया अमेरिकेत दाखल झाली असून कसून सरावाला सुरुवात केली आहे. भारताचा पहिला सामना पाच जून रोजी आयर्लंडविरोधात होणार आहे. त्याआधी एक जून रोजी भारतीय संघ बांगलादेशविरोधात वॉर्मअप सामना खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघाने कसून सराव केला. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सिराज, बुमराह यांच्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी नेट्समध्ये कसून सराव केला. टीम इंडियाच्या ट्रेनिंगचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 


स्टार स्पोर्ट्सने टीम इंडियाच्या खेळाडूंचा सराव करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा आणि इतर अनेक खेळाडू नेट्समध्ये सराव करताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही दिसत आहे. हार्दिकपासून सूर्यकुमार आणि शुभमन गिलपर्यंत सर्वजण स्टायलिश सनग्लासेस घालून सराव करत आहे. भारताने आपली तयारी सुधारण्यासाठी कठोर सराव सुरू केल्याचं दिसत आहे. 


पाहा व्हिडीओ - 






विराट कोहली अद्याप भारतातच - 


भारताचा अनुभवी खेळाडू विराट कोहली अद्याप भारतातच आहे. त्याने बीसीसीआयकडून सुट्टी घेतली आहे. इतर सर्व खेळाडू T20 विश्वचषक 2024 साठी यूएसएला पोहोचले आहेत, परंतु विराट कोहली अद्याप संघात सामील झालेला नाही. कोहली बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्याला मुकण्याची शक्यता आहे, त्यानंतर तो टीम इंडियासोबत सामील होईल. आयपीएल 2024 नंतर विराट कोहलीने बीसीसीआयकडून काही दिवसांचा ब्रेक मागितला होता, जो स्वीकारण्यात आला होता. यामुळेच कोहली अद्याप सराव शिबिरात भारतीय संघात सहभागी झालेला नाही.


टीम इंडिया संतुलित 


रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल टीम इंडियासाठी सलामीची जबाबदारी पार पडतील. आयपीएलमधील दोघांची कामगिरी पाहिली, तर सातत्य दिसत नाही. पण दोघांनीही यंदाच्या हंगामात शतक ठोकलेय. आयपीएलआधी झालेल्या अफगाणिस्तानविरोधातील मालिकेत दोघांनीही खोऱ्याने धावा जमवल्यात. दोघांची फलंदाजी टीम इंडियाची ताकद वाढवते. सूर्यकुमार यादव यानं दुखापतीनंतर कमबॅक केलेय. संजू सॅमसनही लयीत आहे.  अष्टपैलू खेळाडूमध्ये हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांचा फॉर्म सध्या गायब असल्याचं दिसतेय. रवींद्र जाडेजा आणि अक्षर पटेल संघात असणं म्हणजे टीम इंडियाची ताकद वाढणार आहे. जसप्रीत बुमराह वेगवान माऱ्याची धुरा संभाळणार आहे. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव ही जोडी फिरकीची ताकद वाढवते. बुमराहशिवाय अर्शदीप आणि मोहम्मद सिराज वेगवान मारा संभाळतील. एकूणच काय तर टीम इंडिया संतुलित दिसतेय.