India vs New Zealand Semifinal : विश्वचषकातील उपांत्य फेरीचा पहिला सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये रंगणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी वानखेडेच्या मैदानावर या दोन्ही संघामध्ये लढत होणार आहे. भारतीय संघाने साखळीतील सर्वच नऊ सामने जिंकून स्पर्धेत वर्चस्व दाखवलेय. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा दिसलाय. भारतीय फलंदाजांनी 2300 पेक्षा जास्त धावा केल्यात. तर गोलंदाजांनी 75 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. भारताच्या भेदक माऱ्यापुढे प्रतिस्पर्धी संघाला एकदाही 300 धावांपर्यंत पोहचता आले नाही. पाहूयात भारतीय खेळाडूंचं मागील 9 सामन्यातील प्रदर्शन
2300 पेक्षा जास्त धावांचा पाऊस -
भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने विस्फोटक फलंदाजी केली. त्याने टीम इंडियाला वादळी सुरुवात करुन दिली, त्यामुळे इतर फलंदाजांना धावा काढताना संघर्ष करावा लागला नाही. रोहित शर्माने 503 धावांचा पाऊस पाडलाय. शुभमन गिल सुरुवातीच्या काही सामन्याला उपलब्ध नव्हता. पण त्यानंतर त्याने धमाका केलाय. शुभमन गिलने आतापर्यंत 270 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने दोन शतक आणि पाच अर्धशतकांच्या मदतीने 594 धावा चोपल्या आहेत. विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाज विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने महत्वाच्या सामन्यात धावांचा पाऊस पाडलाय. श्रेयस अय्यर सुरुवातीला लयीत नव्हता... पण स्पर्धा जसजशी पुढे गेली तसतसा त्याने धावा खोऱ्याने काढल्या. श्रेयस अय्यर याने एका शतकाच्या मदतीने 421 केल्या आहेत. अय्यरने नेदरलँड्सविरोधात शतक ठोकले होते, त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. केएल राहुल यानेही आपली प्रतिभा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. केएल राहुलने 347 धावा केल्या. त्यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. राहुलने कठीण परिस्थितीत धावा काढल्या आहेत. रविंद्र जाडेजाने अष्टपैलू खेळाडूची जबाबदारी चोख बजावली आहे. त्याने 111 धावांसह 16 विकेट्सही घेतल्या आहेत.
भारतीय गोलंदाजांचा दबदबा -
यंदाच्या विश्वचषकात भारतीय गोलंदाजी आक्रमण सर्वात बेस्ट असल्याचे अनेक दिग्गजांनी सांगितलेय. त्याला साक्ष आकडे देत आहेत. भारतीय माऱ्यापुढे प्रतिस्पर्धी संघाला 300 धावांचा पल्ला कधीही पार करता आला नाही. भारतीय गोलंदाजांनी 75 विकेट घेतल्या आहेत. त्यामध्ये जसप्रीत बुमराह 17 विकेट्सह आघाडीवर आहे. कुलदीप यादवने 14 विकेट घेतल्या आहेत. मोहम्मद शामीला कमी संधी मिळाली, पण त्याने त्यामध्ये 16 फलंदाजांची शिकार केली. मोहम्मद सिराजने 12 विकेट घेतल्या आहेत. रवींद्र जाडेजाने 16 विकेट घेतल्यात. भारतीय गोलंदाजांनी यंदाच्या विश्वचषकात 75 विकेट घेतल्या. तर फलंदाजांनी 2300 पेक्षा जास्त धावा केल्यात. आता सेमीफायनलमध्ये टीम इंडिया कशी कामगिरी करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय.